एसटी खेळतेय प्रवाशांच्या जिवासोबत, आगप्रतिबंधक यंत्रणाच गायब

दौलत झावरे
Saturday, 16 January 2021

राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागात एकूण 668 बस होत्या. त्यांपैकी 88 बस मालवाहतुकीसाठी तयार करण्यात आल्या,

नगर ः भंडारा येथील घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले असले, तरी ही सतर्कता कागदोपत्रीच दिसते. राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागातील अनेक बस आगप्रतिबंधक यंत्रणेविनाच धावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एसटीला प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी नसल्याचेच स्पष्ट होते. 

राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागात एकूण 668 बस होत्या. त्यांपैकी 88 बस मालवाहतुकीसाठी तयार करण्यात आल्या, तसेच 100 बस मुंबईत "बेस्ट'ला तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील 11 आगारांतून 480 बसच्या माध्यमातून जिल्ह्यांतर्गत, आंतरजिल्हा व आंतरराज्य, अशी सेवा प्रवाशांना सध्या दिली जात आहे. प्रवासी सेवा हेच व्रत घेऊन एसटीचा अखंड प्रवास सुरू असला, तरी आता प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा - भाजपचे चाणक्य रोहित पवारांच्या भेटीला

जिल्ह्यातील अनेक बसमधील आगप्रतिबंधक उपकरणे कालबाह्य झाल्यामुळे काढून ठेवली आहेत. काही बसमध्ये ती असली, तरी मुदत संपल्याने ती फक्त शोभेची वस्तू बनली आहेत. 
भंडारा येथील आगीच्या घटनेमुळे राज्य सरकारने प्रत्येक विभागास आगप्रतिबंधक उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे. असे असतानाही एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, एसटी आगारासह तेथील वर्कशॉप व जिल्ह्यातील एसटीच्या 13 डिझेल पंपांवरील काही आगप्रतिबंधक उपकरणेही कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ही सर्व आगप्रतिबंधक उपकरणे रिफिलिंग करून प्रवाशांसह कर्मचाऱ्यांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे. 

(चौकट) 
बसची आकडेवारी 
एकूण बस ः 668 
मालवाहतुकीसाठी ः 88 
मुंबईला दिलेल्या ः 100 
नगर विभागाकडे ः 480 
--- 
कोट 
प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी एसटी प्रशासनाकडून नेहमीच घेतली जाते. आगप्रतिबंधक उपकरणे सर्वच बसमध्ये बसविण्यात आली आहेत. यासंदर्भात माहिती घेऊन उपाययोजना केल्या जातील. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर विभाग 
--- 
(चौकट) 
उपाययोजना करण्याची मागणी 
खडका फाटा येथे बसला आग लागून प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना जिल्ह्यात यापूर्वी घडली आहे. एका महिला प्रवाशाने बस पेटवून देण्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सतर्क होऊन उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fire system in the ST itself is missing