हॅप्पी बर्थ डे...लाल परी! नगर-पुणे धावली पहिली एसटी बस

सुनील गर्जे
सोमवार, 1 जून 2020

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही महिन्यांतच नगर ते पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस 1 जून 1948 रोजी धावली होती. तेव्हापासून हा दिवस एसटीचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.

नेवासे : सर्वसामान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या एसटी महामंडळाला उद्या (सोमवारी) 72 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या "परिवहन दिना'निमित्त एसटी महामंडळाकडून जिल्ह्यासह राज्यभर विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, यंदा या लाल परीच्या वाढदिवसावर कोरोनाचे सावट असल्याने, कोणत्याच उपक्रमाचे आयोजन केलेले नाही. 
प्रत्येक वर्षी परिवहन दिनानिमित्त प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर, सोबतच उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव होतो.

विशेष म्हणजे, या दिवशी प्रत्येक प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही महिन्यांतच नगर ते पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस 1 जून 1948 रोजी धावली होती. तेव्हापासून हा दिवस एसटीचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा - अजितदादांचा कॉल झालाय व्हायरल 

2014पासून एसटी महामंडळाचा वर्धापनदिन हा दिवस "परिवहन दिन' म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. एसटीबाबत कर्मचारी, प्रवाशांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, यादृष्टीने वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बसस्थानकांची सजावट, परिसरस्वच्छता, आगार आणि बसस्थानकात दर्शनी भागात परिवहन दिनाचे फलक, बस स्वच्छ करणे, तसेच बसस्थानके स्वच्छ, सुशोभित केली जातात. 

विशेष म्हणजे, या दिवशी एसटीच्या सर्व आगारांत उत्तम कामगिरी करणारे वाहक-चालक, यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात येतो. एसटीच्या अधिकाऱ्यांचा प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी होणारा संवाद व त्यांच्या अडचणी जाणून घेणे, असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, मोठ्या उत्साहात होणाऱ्या "परिवहन दिना'वर यंदा कोरोनाचे सावट आहे. 

72 वर्षांत एसटीचा आवाका 
एसटी महामंडळाने 2018-19मध्ये रोज सरासरी 74.12 लाख प्रवासी वाहतूक केली. सध्या महामंडळाकडे 250 आगारे, 568 स्थानके, 18,625 बस, 1,07,500 कर्मचारी आहेत. 59.12 लाख किलोमीटर प्रतिदिन, असा एसटीचा प्रवास आहे. 

 

प्रत्येक वर्षी एसटी महामंडळातर्फे परिवहन दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्याची तयारी व वरिष्ठांच्या सूचना, या अगोदरच येत असतात. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कोणत्याही सूचना आल्या नाहीत. 
-किशोर आहेरराव, आगारप्रमुख, नेवासे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first ST bus to run Nagar-Pune