रेखा जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी पाचजण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

रेखा जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व मैत्रीण, असे चौघे मोटारीतून सोमवारी (ता. 30) सायंकाळी पुण्याहून नगरकडे येत होते. नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटाजवळ त्यांच्या मोटारीस दुचाकीस्वारांनी कट मारला.

पारनेर/नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली.

पारनेर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी उशिरा आणखी दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतल्याचे समजते. फिरोज राजू शेख (वय 26, रा. संक्रापूर, आंबी, ता. राहुरी), ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी : रेखा जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व मैत्रीण, असे चौघे मोटारीतून सोमवारी (ता. 30) सायंकाळी पुण्याहून नगरकडे येत होते. नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटाजवळ त्यांच्या मोटारीस दुचाकीस्वारांनी कट मारला. त्यानंतर पुढे जाऊन जातेगाव घाटात दुचाकी आडवी लावून जरे यांची मोटार अडविली. त्यावेळी दुचाकीस्वारांसोबत जरे यांची बाचाबाची झाली. वाद सुरू असतानाच, एका आरोपीने रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच जरे यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जरे यांच्या आई सिंधूबाई सुखदेव वायकर यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सोमवारी रात्रीच गुन्ह्याचा तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री संक्रापूर येथून आरोपी फिरोज शेख याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे व आदित्य चोळके यांना राहाता व श्रीरामपूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

भक्‍कम पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. पारनेर न्यायालयाने त्यांना सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोघांना कोल्हापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. 

आरोपीचा फोटोच ठरला मुख्य दुवा 
जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा घेतलेला फोटो पोलिस तपासात मोठा दुवा ठरला. हा आरोपी फिरोज शेख आहे. 
 

अपघाताचा बनाव करून रेखा जरे पाटील यांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. परंतु, यामागे दुसरे कारण असण्याचीही शक्‍यता आहे. याबाबत कसून तपास करीत असून, तपासाअंती सत्य समोर येईल. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five arrested in Rekha Jare Patil murder case