माथाडी कामगारांना पाच लाखांची विमा सुरक्षा

सुर्यकांत नेटके
Saturday, 26 December 2020

जिल्ह्यातील नियमित पगार घेणाऱ्या माथाडी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये अपघात विमा योजनेचा लाभ नगर माथाडी कामगार मंडळाकडून मृत कामगाराच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील नियमित पगार घेणाऱ्या माथाडी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये अपघात विमा योजनेचा लाभ नगर माथाडी कामगार मंडळाकडून मृत कामगाराच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

तसेच एक लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे, असे जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2410 नियमीत माथाडी कामगारांना दिला जाणार आहे. याच यापूर्वी माथाडी कामगाराचा मृत्यू झाल्यास 3 लाख रुपये अपघात विमा व 75 हजारापर्यंत वैद्यकीय विमा देण्यात येत होता. परंतू वाढत्या महागाईचा विचार करता माथाडी मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील माथाडी कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख रूपये लाभ तसेच 75 हजार रुपये वैद्यकीय खर्चासाठी अपघाती विमा योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यास कामगार आयुक्त राऊत यांनी मंजुरी देऊन 14 डिसेंबर 2020 पासून माथाडी कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंबीयांना 5 लाख रुपये अपघात विमा व 75 हजार रुपये वैद्यकीय खर्चासाठी विमा योजना लागू करण्यात आली. त्याचा हप्ता माथाडी मंडळाने भरला आहे. यासाठी माथाडी मंडळाचे निरीक्षक सुनील देवकर यांचे सहकार्य लाभले, असल्याचे घुले यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh insurance cover for Mathadi workers