
कुकाणे (जि. नगर) : शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका मागून एक अशा पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले.
त्यांच्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वाकडी (ता. नेवासे) येथे मंगळवारी दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
बबलू काळे (वय २८), अनिल काळे (वय ५५), माणिक काळे (वय ६५), संदीप काळे (वय ३२), बाबासाहेब गायकवाड (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. नगर येथील रुग्णालयात विजय काळे (वय ३५) उपचार घेत आहेत.
वाकडी येथील अनिल काळे यांच्या शेतावर वस्तीलगत जुनी विहीर आहे. कमी खोली असल्याने त्यामध्ये जनावरांचे शेण मलमूत्र साठवले होते. या विहिरीमध्ये मांजर पडले. त्याला वाचविण्यासाठी विशाल ऊर्फ बबलू काळे (वय २३) विहिरीत उतरला.
तो बाहेर आला नसल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल काळे विहिरीत उतरले. तेही वर आले नाही, हे पाहून शेजारच्या शेतात असलेले बाबासाहेब गायकवाड त्यांच्या मदतीसाठी विहिरीत उतरले. तेही वर आले नाहीत.
अनिलचे चुलत भाऊ संदीप काळे हे रस्त्याने जात होते. त्यांना आवाज आल्याने मदतीला विहिरीत उतरले. तेही वर आले नाहीत. हे पाहून त्यांचे वडील माणिक काळे विहिरीत उतरले. तेही बेशुद्ध होऊन गाळात पडले. या दरम्यान विजय काळे कमरेला दोर लावून विहिरीत उतरला. विषारी वायूचे लक्षणे जाणवताच त्याने आवाज दिला. लोकांनी त्याला वर काढले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समजताच काही स्थानिक नेत्यांनी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे व भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, सरपंच संभाजी काळे, पोलिस पाटील ॲड. अंजली काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी प्रशासनास कळवून मदतीसाठी प्रयत्न केले. ही घटना समजतात तहसीलदार संजय बिरासदार व पोलिस निरीक्षक धनंजय जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी विहिरीत पंप टाकून पाणी उपसण्यास सुरुवात केली. नगर, श्रीरामपूर, संभाजीनगर येथून विशेष पथक बोलाविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
मृतांमध्ये काळे कुटुंबातील चार पुरुषांचा समावेश आहे. हे कुटुंब शेती करते. घरातील कर्ते पुरुष गेल्यामुळे महिलांनी टाहो फोडला. गुढीपाडव्याच्या दिवशीच झालेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
रात्री ९.१५ वाजता विशाल अनिल काळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अन्य चार मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. रेस्क्यू टीमसह पोलिस यंत्रणा, महसूल विभाग, आरोग्य विभाग व आवश्यक सर्व विभाग घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
- धनंजय जाधव, पोलिस निरीक्षक, नेवासे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.