संगमनेर तालुक्याने ओलांडला पाच हजारांचा टप्पा; ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढले

आनंद गायकवाड
Saturday, 28 November 2020

अन्य सणांपेक्षा दिवाळी सणाच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती.

संगमनेर (अहमदनगर) : अन्य सणांपेक्षा दिवाळी सणाच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. अपेक्षेप्रमाणे कोविड रुग्णांची संख्या वाढली असून, शहराच्या तुलनेत तालुक्यातील विविध गावांमधून बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने खेड्यापाड्यातील ग्रामस्थांनी शहरातील विविध प्रकारच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. शहातील गल्ली बोळांसह प्रमुख रस्ते माणसांसह दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गर्दीने वाहू लागले होते. या गर्दीमुळे कोविड नियमांच्या मास्क, सँनिटायझर व सुरक्षीत अंतर या त्रिसुत्रीचा जवळपास सर्वांना विसर पडल्याने, दुकानदार व ग्राहकांमध्येही बेफीकीरवृत्ती निर्णाण झाली होती. जवळपास आठ महिने घेतलेल्या विश्रांतीनंतर पुन्हा बाजारपेठ नव्या जोमाने फुलली होती. याचा परिणाम दिवाळीच्या दुसऱ्या दिवसानंतर दिसू लागला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील आटोक्यात येवू पहाणारे संक्रमण पुन्हा वाढल्याची आकडेवारी दिसू लागली. त्यामुळे सध्यातरी तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 279 झाली असून, बाधितांचा एकूण आकडा 5 हजार 75 वर पोचला आहे. मात्र तालुक्यातील आजवर बाधीत झालेल्या 159 पैकी 100 गावांमधील रुग्णसंख्या शून्य झाली ही जमेची बाजू आहे. उर्वरीत 59 गावांमध्ये 279 रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.

दिवाळीनंतर 16 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत तालुक्यात सरासरी 41 बाधीत रुग्ण समोर आले आहेत. यात ग्रामीणभागासह शहरी भागाच्या रुग्णांची संख्याही वाढली. या अकरा दिवसांत तालुक्यात 452 रुग्ण आढळले. यात शहरातील 121 ( 11 रुग्ण रोज ) व ग्रामीण भागात 331 ( 30 रुग्ण रोज ) या गतीने रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे तालुक्याची कोविड बाधीतांच्या रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. संक्रमण रोखण्यासाठी कोविडच्या शासकिय नियमांचे काटेकोर पालन आपली नैतिक जबाबदारी म्हणून पाळण्याची आवश्यकता आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand positive patients of Corona in Sangamner taluka