esakal | परदेशाची वाट अडवली तरी कांदा सुटला सुस्साट
sakal

बोलून बातमी शोधा

Five thousand rupees per quintal of onion in Parner

बाजार समितीत आज 13 हजार 330 कांदागोण्यांची आवक झाली. आवक जास्त होऊनही दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच क्रमांक एकच्या कांद्यास क्विंटलमागे 5100 रुपये, दोन नंबर कांदा 3400 ते 4200 रुपये भाव मिळाला.

परदेशाची वाट अडवली तरी कांदा सुटला सुस्साट

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः केंद्र सरकारच्या निर्यातबंदीनंतरही येथील बाजार समितीत आज एक नंबर कांद्यास चांगला भाव मिळाला. तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर कांदा भाव खाऊन गेला. 

बाजार समितीत आज 13 हजार 330 कांदागोण्यांची आवक झाली. आवक जास्त होऊनही दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच क्रमांक एकच्या कांद्यास क्विंटलमागे 5100 रुपये, दोन नंबर कांदा 3400 ते 4200 रुपये भाव मिळाला.

अद्यापि तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात साठविलेला कांदा शिल्लक आहे. तसेच सध्या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कांदालागवडी सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी काही दिवस कांदा बाजार बंद होता. हॉटेल बंद होते. त्यामुळे कांद्याचे भाव थेट पाच ते सहा रुपये किलोवर आले होते. 

लॉकडाऊनमुळे बाजार समित्यांचे खरेदी-विक्री व्यवहार तब्बल अडिच महिने बंद करण्यात आले. बाजार समितीमधील खरेदी-विक्री सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन काळात व त्यानंतर बाजार समितीत कांद्याचे जाहीर लिलाव सुरू झाल्यावर भाव मोठ्या प्रमाणात कोसळले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यातून कांदालागवडीचा खर्चही वसुल होत नव्हता. आता मात्र कांद्याचे बाजार हळुहळू वाढू लागल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. 


राज्यातील सर्वच व्यवहार सुरळीत होत आहेत. कांदा बाजारही सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी कांदाविक्रीची घाई करू नये. बाजार आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चांगला माल विक्रीसाठी आणावा. परस्पर शेतात कांदाविक्री करू नये, फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. 
- प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर 

संपादन - अशोक निंबाळकर