
पाथर्डी (जि. अहमदनगर) : पुरात दावणीची जनवारे वाहून गेली. दुग्धोत्पादन थांबल्याने वाहती लक्ष्मी वाहत्या पाण्याने थांबली. नवरात्रोत्सवात शेतकऱ्यांची पोरं हार-फुले विकायची. थोडा रोजगार मिळायचा. तोही यावर्षी नाही. त्यातच दिवाळी व्हायची. दसरा कसाबसा हसरा केला. दिवाळी करायची कशी. आधीच मोठे नुकसान झालेले. त्यात दिवाळीचा खर्च नाही झेपणार. पोराबाळांना कसंबसं समजावं लागेल. मायबाप सरकारने दिवाळीपूर्वीच काहीतरी मदत दिली, तरच रोषणाई होईल. नुकसानभरपाई पूर्ण नाही, तर किमान थोडीतही हवी. सरकारने दिवा नाही, तर पणती तरी द्यावी.
अतिवृष्टीने पळवला तोंडाशी आलेला घास
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊनही अद्याप शासनाने एक रुपयाही नुकसान भरपाई दिली नाही. दसरा सण कसाबसा साजरा केला, मात्र येणारी दिवाळी सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मागील महिन्यात तालुक्यात सर्वदूर मोठी अतिवृष्टी झाली. काहींच्या शेतातील जमीन वाहून गेली, तर काहींचे जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेकांच्या दुकानात पाणी गेले. दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले. संसार देशोधडीला लागले. नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र भरपाई एक रुपयाही मिळाला नाही. त्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली, मात्र उपयोग नाही.
नुकसान मोठे, भरपाई मात्र शुन्य
पाथर्डी तालुका मुळातच दुष्काळी. राज्यात या तालुक्याची ओळख मोहटा देवस्थानमुळे. कधी नव्हे तो चांगला पाउस झाला. पण ओला दुष्काळ. पिके आली मात्र निसर्ग कोपला. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. विशेषतः तालुक्याच्या कोरडगाव व माणिकदौंडी भागात अतिवृष्टीचे प्रमाण अधिक होते. शासन तातडीने मदत देईल, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. नवरात्रोत्सवात गर्दी नव्हती. या काळात तालुक्यात अनेकांना रोजगार मिळतो, त्यास संबंधित व्यावसायिक मुकले. दसरा सण कसाबसा झाला. बाजारपेठा हिरमुसल्या. हव्या तशा फुलल्याच नाहीत. कोरोनाचा (Corona) परिणाम होता. कोरोना ओसारतोय, पण बाजारपेठा फुलेनात. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती बरोबरच दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. कर्ज काढून जनावरे घेतली, मात्र काहींची ही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भरपाई मात्र शुन्य. काही उसतोड मजुरांच्या मुलांनी कर्जे काढून विविध व्यवसाय सुरू केले. झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता सतावत आहे. बॅंकांचे तगादे सुरु झाले.
राजकारणात भरडला जातोय सर्वसामाऩ्य
एकीकडे ही परस्थिती असताना दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी आघाडी पक्षाचे तालुक्यातील नेते ‘धीर धरा, नुकसान भरपाई‘ मिळेल, असे सांगतात. दुसरीकडे मदत द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विरोधी आघाडीचे नेते देत आहेत. लोक आंदोलनाला पळतात, ते काहीतरी पदरात मिळेल या आशेने. या राजकारणात जो भरडला गेला, त्याचा मात्र बळी जात आहे. त्यातच आता दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. ही दिवाळी गोड होणार की कडू, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
तातडीने नुकसानभरपाई हवीच
दसरा सणाच्या काळात काही प्रमाणात बाजारपेठेत उलाढाल झाली. दिवाळीच्या काळात ती होईल की नाही त्याची खात्री नाही. अनेक सधन व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात माल भरून ठेवला आहे. मात्र बाजारात गर्दी होईलच, याची शास्वती नाही. व्यापारी चिंतेत आहेत. त्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी काहीही करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. अगोदर आलेल्या कोरोनामुळे अनेक महिने व्यवसाय बंद होते, त्यातून सावरायला नुकतीच सुरवात झाली होती, मात्र अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. शासनाने नुकसान भरपाई दिली, तर बाजारपेठेत पुन्हा उर्जितावस्था निर्माण होईल, अन्यथा दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न सर्वांसमोर आ वासून उभा ठाकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.