फुलांचे होतात अश्रू, यंदा झालं "सोनं"

अमित आवारी
Friday, 13 November 2020

यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नवरात्रोत्सवात जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले. दसरा- दिवाळी डोळ्यासमोर ठेवून बागायतदार शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात.

नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे फूलउत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने फुलशेती चांगलीच बहरली आहे. त्यामुळे दिवाळीत फूलबाजार चांगलाच फुलला आहे. फुलांना सध्या दरही चांगला मिळत आहे. एरवी फुलांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. यंदा मात्र त्याचे सोने झाले. असे असले तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांमुळे आसू आणि हासू अशी अवस्था आहे.

यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नवरात्रोत्सवात जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले. दसरा- दिवाळी डोळ्यासमोर ठेवून बागायतदार शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. मात्र, ऐन नवरात्रोत्सवात झालेल्या पावसामुळे, काढणीस आलेली फुले खराब होऊ लागली.

शेतकऱ्यांच्या हाती नेहमीपेक्षा कमी पीक आले. शिवाय, पुरेसा भावही दसऱ्याच्या वेळी मिळाला नाही. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने फुलशेती चांगलीच बहरली आहे. बाजारपेठेतही फुलांना मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. शहरातील मार्केटयार्डमध्ये आज सकाळपासूनच फुलांची मोठी आवक झाली. 

फुलांचे दर (किलोप्रमाणे) 
झेंडू - 100 ते 150 
शेवंती - 250 
अस्टर - 250 ते 300 
गुलटोप - 150 ते 200 
गुलाब - 300 (सुटा) 
गुलछडी - 500 
तुळजापुरी - 100 ते 120 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers got good price in Ahmednagar