सुप्यातील एमआयडीसीवरच सारी भिस्त, परदेशी कंपन्यांमुळे विकासाला मिळेल बळ... आमदार नीलेश लंके यांचे मत

Foreign companies will get development at Supa
Foreign companies will get development at Supa

नगर ः कोरोनाच्या जागतिक संकटामुळे उद्योगक्षेत्रावर न भूतो न भविष्यती असे संकट आले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आता नव्या उमेदीने उद्योग सुरू व्हायला हवेत. त्यासाठी उद्योजकांना विश्‍वास आणि कामगारांना दिलासा द्यावा लागेल, असे मत आमदार नीलेश लंके यांनी आज व्यक्त केले. 

कॉफी विथ सकाळ

लंके यांनी आज "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात "सकाळ' कार्यालयास भेट देऊन संपादकीय टीमशी संवाद साधला. कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी लंके यांचे "राजकारण व माध्यमे' हे पुस्तक देऊन स्वागत केले. वनकुटे (ता. पारनेर) येथील सरपंच ऍड. राहुल झावरे, पिंपळगाव रोठे येथील सरपंच अशोक घुले, हंगे येथील उपसरपंच अनिल सूर्यवंशी लंके यांच्या समवेत होते. 

सारी भिस्त सुप्यावर

लंके म्हणाले, ""नगर जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राची सारी भिस्त आता सुपे औद्योगिक क्षेत्रावर आहे. 50 मोठे कारखाने हे 
जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राचा आत्मा आहेत. याशिवाय येऊ घातलेल्या परदेशी कंपन्यांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उद्योजकांना सहानुभूती नको; परंतु सरकारचे विविध अंगांनी पाठबळ हवे आहे.'' 

परप्रांतीय मजूर गेले

लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर सुप्यासह विविध उद्योगक्षेत्रांतील परप्रांतीय कामगार आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे आता शासकीय नियम पाळीत व कोरोनावर मात करीत उद्योग सुरू केले, तरी कामगार, कुशल मनुष्यबळ, जागतिक पातळीवर येऊ घातलेली आर्थिक मंदी या बाबींमुळे पूर्ण क्षमतेने उद्योग चालण्यास यश येईल की नाही, याबाबत उद्योजक साशंक आहेत.

भीती दूर करायला हवी

उद्योजकांमधील ही भीती दूर करणे गरजेचे असून, त्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर विशेष प्रयत्न व्हायला हवेत. परप्रांतीय कामगारांना पुन्हा बोलावून त्यांनाही विश्‍वास द्यावा लागेल. त्याशिवाय उद्योगांसह इतर विविध क्षेत्रांची घडी पुन्हा बसविणे शक्‍य होणार नाही, असे लंके यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय सेवा व अन्न पुरवले

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड यांसह विविध राज्यांतील कामगारांना निवारा व जेवण देण्याचे काम आपण केले. सुपे एमआयडीसी परिसरातील एकही कामगार उपाशी राहू देणार नाही, असा चंग आपण बांधला होता. कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही निवारा व अन्न पुरविले. वैद्यकीय सेवा दिली. लहान मुलांना बिस्किटे, दूध पावडर पुरविली. सुपे येथे चांगली व्यवस्था होत असल्याचे सर्वत्र पोचल्याने रांजणगाव, चाकण एमआयडीसीमधील कामगारही आमच्याकडे येत होते.

दररोज किमान २००जणांना चपला दिल्या

कोणताही भेदभाव न करता त्यांनाही त्याच न्यायाने मदत केली. दररोज किमान 200 जणांना पादत्राणे दिली. चादरींच्या माध्यमातून त्यांना ऊब देता आली. त्यामुळेच कोणतेही मोठे सत्ताकेंद्र नसताना सामान्य कार्यकर्ते व जनतेच्या बळावर मोठे काम करता आले, याचे खूप मोठे समाधान आहे, असे लंके यांनी सांगितले. 

घोळबाज धान्य दुकानदारांना सरळ केलं

व्यापार, व्यवसाय, नोकरीनिमित्त पारनेर तालुक्‍यातील घराघरातील माणूस आणि त्यासोबतची कुटुंबे मुंबईला स्थिरावली आहेत. लॉकडाउन काळात 60 हजारांपेक्षा जास्त कामगार 20 ते 27 मार्चच्या दरम्यान तालुक्‍यात आले. आपण तलाठी, ग्रामसेवक, आशासेविका यांच्या माध्यमातून त्यांचे मॉनिटरिंग केले. काही "घोळबाज' धान्य दुकानदारांना "सरळ' करण्याची मोहीम राबविली.

निवारा केंद्रात पहाटेच जेवण

प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना सातत्याने भेट देऊन तेथील अडचणी दूर केल्या. चांगले काम करणाऱ्या आरोग्य, महसूल, ग्रामविकास व पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप मारीत त्यांना प्रोत्साहन आणि भरोसा दिला. गावोगावच्या क्वारंटाईन सेंटरला सतत भेटी दिल्या. निवारा केंद्रांतील गरजूंना पहाटे तीनलाही जेवण उपलब्ध करून दिले. या सर्व बाबींचा परिणाम पारनेर तालुका कोरोनाच्या महामारीपासून सुरक्षित राहण्यात झाला. 

घरी पोचेपर्यंत पाठपुरावा केला 
नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक कामगार आपल्याकडे येऊन गावी पोचविण्याची विनंती करत होते. आपण आपले सहकारी व सामान्य जनतेच्या पाठबळावर या सर्व मंडळींना त्यांच्या गावापर्यंत व घरापर्यंत पोचविण्याची मोहीम फत्ते केली. आमच्या टीमने या संदर्भात संबंधित चालकाकडे सतत पाठपुरावा केलाच; परंतु घरी पोचेपर्यंत प्रत्येक कामगाराच्या खाण्या-पिण्याची सोय केली. हे सर्व आपल्या कार्यशैलीचे वेगळेपण होते, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते, असे आमदार नीलेश लंके यांनी अभिमानाने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com