अहमदनगर : बिल्‍डिंगचेच जंगल; शहरात फक्त ६० हजार झाडे

वृक्षांबाबत नगरकर रूक्ष, ५ लाख लोकसंख्येसाठी ९ लाख वृक्षांची गरज; वृक्षलागवडीकडे मनपाचे दुर्लक्ष
Building
BuildingSakal

अहमदनगर - पाच लाख लोकसंख्या असलेल्या अहमदनगर शहरात अवघे ६० हजार वृक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ नुसार प्रत्येक शहरात व्यक्तीमागे दोन वृक्ष असणे बंधनकारक आहे. त्यानुसार अहमदनगर शहरात कमीत कमी ९ लाख वृक्षांची आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेने वृक्ष लागवड अन् संगोपनाकडे पाठ फिरवली आहे.

वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शहर स्वच्छता आराखडा, सीना नदी सुशोभिकरण तसेच एकेरी वाहतूकसारख्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत एकदाही पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल सादर केला नाही. प्रक्रिया न करता सीना नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी, अयोग्य पद्धतीने होणारे घनकचरा संकलन, अवजड वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण, वृक्षलागवड व संगोपनाकडे झालेले दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा बोजवारा उडाला आहे. केंद्र व राज्य पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहराचा वार्षिक पर्यावरण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, या निर्देशांना पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी पर्यावरण अहवालासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात येते. मात्र, अहवाल तयार होत नाही. परिणामी वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे.

वृक्षगणनेचा विसर

महापालिकेने आतापर्यंत एकदाही वृक्षगणना केली नाही. त्यामुळे शहरात किती वृक्ष आहेत, याबाबत प्रशासनच अनभिज्ञ आहे. हरियाली संस्थेने केलेल्या गणनेत शहरात सुमारे ६० हजार मोठे वृक्ष असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी १८७ वृक्ष दुर्मिळ प्रजातीचे आहेत. मनपा क्षेत्रात दरवर्षी वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो, परंतु झाडांची संख्या अद्यापि वाढली नाही.

वृक्ष कर भरूनही मिळेना सावली

पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरांच्या तुलनेत नगर शहरात झाडांचे प्रमाण खूपच कमी आहे. शहरातील प्रत्येक एक कुटुंब ०.५० टक्के (सुमारे ११ रूपये) वृक्षकर महापालिकेला देते. असे असतानाही शहरात वृक्ष वाढायला तयार नाही. नाशिक-पुणेसारख्या शहरात मात्र इमारतींबरोबरच मोठी वृक्षदेखील दिसतात. हे चित्र नगर शहरातही दिसावे, अशी वृक्षप्रेमींची मागणी आहे. केडगाव, सारसनगर, गुलमोहर रोड, तपोवन रोड अशा काही भागात थोडीफार झाडे दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com