ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्या; अन्यथा भाजपचे आंदोलन

दत्ता उकिरडे
Monday, 19 October 2020

अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतात असणारी पिके, फळबागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत.

राशीन (अहमदनगर) : 'अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतात असणारी पिके, फळबागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना यातुन बाहेर काढण्यासाठी सरकारने वेळ न दवडता आता सरसकट मदत जाहीर करावी, अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री राम शिंदे यांनी दिला आहे.

अतिवृष्टी गावांच्या दौऱ्याप्रसंगी चिलवडी येथे ते बोलत होते. नुकसानीचे सरसकट पंचनामे होऊन त्यांना सरकारकडून मदत व्हावी, यासाठी माजी मंत्री शिंदे यांनी राशीन गटातील अतिवृष्टी झालेल्या होलेवाडी, चिलवडी, वायसेवाडी, खेड, बारडगाव सुद्रीक आदी गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त करत तेथील शेतकऱ्यांना धीर त्यांनी दिला.

प्रा. शिंदे म्हणाले, राज्याच्या सरकारमधील मंडळी गेल्यावर्षी सांगायचे तातडीने मदत दिली पाहिजे. आता वेळ न दवडता शेतकऱ्यांना मदत केली तरच या संकटातून शेतकरी वाचतील. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल गावडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे,करपडीचे माजी सरपंच सुनिल काळे, विक्रम राजेभोसले, राशीनचे शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता गोसावी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, तात्यासाहेब माने, साहिल काझी, सोमनाथ कोल्हटकर आदी उपस्थित होते.

दरम्यान विजेच्या धक्क्याने मृत झालेले वायरमन (स्व) कुंडलिक कानगुडे यांच्या कुटूंबियांचलचे कानगुडवाडी येथे जाऊन प्रा. शिंदे यांनी सांत्वन केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former BJP MLA Ram Shinde inspects agriculture in Rashin