राळेगणसिद्धीचे माजी उपसरपंच लाभेष औटी यांनी घेतली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट

एकनाथ भालेकर
Friday, 18 December 2020

राज्य व केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेंतर्गत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : २०१८ मध्ये विशेषबाब म्हणून मंजूरी मिळालेल्या राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी राज्य व केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेंतर्गत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राळेगणसिद्धीचे माजी उपसरपंच लाभेष औटी यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शरद मापारी, रोहन उगले, एकनाथ भालेकर आदी उपस्थित होते. राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑगस्ट २०१८ मध्ये विशेष बाब म्हणून मंजूरी मिळाली असून अद्यापही इमारत बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य केंद्राची इमारत झाली तर परिसरातील गावांतील रूग्णांना आरोग्य सेवेचा लाभ होऊ शकेल. इमारत बांधकामासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती औटी यांनी यावेळी दिली. यावर आरोग्य मंत्री टोपे यांनी राज्य शासन, जिल्हा नियोजन मंडळ अथवा केंद्राच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन यावेळी औटी यांना दिले.

कोरोना महामारीच्या भयभीत काळात इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर राज्यातील सर्व जनतेला दिलासा देणारा चेहरा व जनतेला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या खरा कोरोना योद्ध्याचे काम केल्याबद्दल राळेगणसिद्धी परिवारातर्फे व  औटी यांच्यासह शिष्टमंळाने त्यांचे यावेळी आभार मानले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याशीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात काम करताना हजारे यांच्यासोबत आलेल्या अनेक अनुभवांना त्यांनी उजाळा दिला. हजारे यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांची दैनंदिनी तसेच राळेगणसिद्धीत नविन कोणकोणती कामे सुरू आहेत याबाबत विचारपूस करत लवकरच राळेगणसिद्धीचा दौरा करणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगीतले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Deputy Panch of Ralegan Siddhi Labhesh Auti meet on Health Minister Rajesh Tope