माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती ठणठणीत पण भेटायला येऊ नका

शांताराम काळे
Sunday, 10 January 2021

माजी मंत्री पिचड यांच्यावर काही दिवसांपासून मुंबई येथे लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची तब्येत सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 

अकोले : माजी मंत्री मधुकरराव पिचड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. परंतु ते आजारातून बाहेर आले आहेत. त्यांची प्रकृतीही ठणठणीत आहे. ते लोकनेते असल्याने अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा वर्ग आहे. कार्यकर्त्यांनाही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी वाटते, भेटण्याचीही इच्छा असते.

आत्ताच आजारातून बरे झाल्याने ते  मुंबई येथील निवासस्थानी आराम करीत आहेत. सध्या त्यांना कोणीही भेटायला येऊ नये, असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. 

हेही वाचा - मोबाईल मॅपने केला घात, पुणेकर गेले धरणात 

माजी मंत्री पिचड यांच्यावर काही दिवसांपासून मुंबई येथे लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची तब्येत सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने काळजी करू नये.

डॉक्‍टरांनी पिचड यांना आरामाचा सल्ला दिल्याने कोणीही त्यांना भेटायला येऊ नये, असे आवाहन वैभव पिचड यांनी केले आहे. सध्या वैभव पिचड व त्यांचे कुटुंब मुंबई येथे माजी मंत्री पिचड यांच्यासमवेत आहे.

दरम्यान, तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत कराव्यात, असे आवाहन करतानाच बिनविरोध विजयी उमेदवारांचेही वैभव पिचड यांनी अभिनंदन केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Minister Madhukarrao Pichad is in good health