आरआर आबा होणं सोप आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरआर आबा होणं सोप आहे का?

आरआर आबा होणं सोप आहे का?

राजकारणात यशस्वी होणं, नावलौकीक मिळवणं, प्रसिद्धीच्या शिखरावर पोचणं, जनतेच्या गळ्यातील ताईत बनणं तसं सोपं नाही. त्यासाठी राजकारणच काय, कोणत्याही क्षेत्रात खूप खस्ता खाव्या लागतात. प्रवास खडतर असतो. कार्यकर्त्याचा नेता घडायला काही वर्षं जातात, हे कटुसत्य आहे. कुणीही उठला आणि नेता झाला, असं कधी होत नाही. ज्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होतो, तसा नेत्याचा मुलगा नेता होतो, असं आतापर्यंत घडत आलंय. आता मात्र तसं चित्र नाही. राजकीय घराण्यातील मुलं-मुली राजकारणात आली म्हणजे यशस्वी होतीलच असं काही सांगता येत नाही. त्याला काही अपवादही असू शकतात.

महाराष्ट्रात जी काही मोठी माणसं होऊन गेली, त्यांचं विस्मरण कधी होत नाही. अगदी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार ते विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेते राज्याने पाहिले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आर आर पाटील (आबा) यांच्यासारख्या नेत्यांना जनतेने नेहमीच डोक्यावर घेतले. ते आज आपल्यात नाहीत, त्यांची आठवण झाली नाही असं कधी होत नाही.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

हे सांगण्याचे कारण असं, की माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी आमदार नीलेश लंकेंना आरआर आबा व्हा म्हटल्यावर त्यांची आठवण झाली. खरं तर आबा जेथे जात, तेथे माणसं जोडत. ते त्यांच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसत. एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेले आबा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान असेल, तंटामुक्ती असेल किंवा डान्स बार बंदी असेल; त्यांनी जे निर्णय घेतले, त्याला विरोध करण्याची हिंमत विरोधकांनाही झाली नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कधी झाले नाहीत.

तासगाव मतदारसंघात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय पाटील यांनी त्यांच्यावर अनेकदा टोकाची टीका केली, पण आबांचा तोल कधी ढळला नाही. ते अनेकदा शिवसेना- भाजपच्या नेत्यांना म्हणत, की आम्हीही ग्रामीण भागातून आलो आहोत. शिव्या का आम्हाला माहीत नाहीत? पण राजकारणातील संस्कार जपणार. राजकारण करताना कुठेही कलंक लागणार नाही, याची काळजी त्यांनी आयुष्यभर घेतली. चांदा ते बांद्यापर्यंत आबांचे लाखो चाहते होते. आबा हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शक्तिस्थळ होते. अनेकदा या शक्तिस्थळावर राजकीय हल्लेही झाले, पण तितक्याच ताकदीने त्यांनी ते परतवून लावले, हे वास्तव आहे. त्यांची विधानसभेतील भाषणं आजही यूट्यूबवर गाजत असतात. भाषण कसे करायचे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. हजरजबाबीपणाविषयी तर काही सांगू नका. ते जितके राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये आवडीचे नेते होते, तितकाच आदर विरोधी पक्षांतही त्यांना होता. सच्चा नेता, अशी त्यांची प्रतिमा होती. आबांपेक्षा राजकारणात रथी-महारथी होते, पण त्यांच्यावर लोकांनी जे प्रेम केलं तसं इतरांच्या वाटेला अलं नाही, हेही तितकंच खरं !

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

आबा अपराजित होते. जनतेच्या ह्रदयाच्या कोपऱ्यात रुतून बसले होते. राजकारणात अनेक चढ-उतार, खाचखळगे त्यांनी पाहिले होते. आबांसारखं आमदार नीलेश लंकेंनी व्हावं, मोठं व्हावं. त्यांना शुभेच्छा आहेत. पण, आबांसारखं होणं नक्कीच सोपं नाही. तरीही लंकेनी आबांसारखं महाराष्ट्रात राहाव अशी जी अपेक्षा झावरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामागचं कारणंही जिल्ह्यातील लोकांना कळलं नाही असं तरी कसं म्हणावं.

loading image
go to top