esakal | सोयाबीन, बटाटानंतर आता भातही नष्ट; कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Former MLA Vaibhav Pichad inspected 15 villages in Akole taluka

शेतकऱ्यांचे सोयाबीन, बटाटा, भात पीक नष्ट झाले आहे. बांधावर बियाणे आलीच नाहीत तर शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे बांध वाहून गेले.

सोयाबीन, बटाटानंतर आता भातही नष्ट; कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : शेतकऱ्यांचे सोयाबीन, बटाटा, भात पीक नष्ट झाले आहे. बांधावर बियाणे आलीच नाहीत तर शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे बांध वाहून गेले. व्याजाने पैसे घेऊन त्यानी खते बियाणे घेतली. कृषी विभागाचा ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यापुढील काळात सरकारने शेतकऱ्यांना हरबरा, गहू बियाणे मोफत देऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.

करंडी, पळसुंदे, अंबितखिंड, फोफसंडी, येसर ठाव यासह १५ गावांचा त्यांनी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाचे, बांध बंदिस्तच्या नुकसानीची पाहणी केली. कोरोना काळात स्थानिक कमेटी, अंगणवाडी सेविका, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना कोरोना योद्धा सर्टिफिकेट देऊन सत्कार केला. 

प्रत्येक गावात आर्सेनिक ३० गोळ्यांचे वाटप केले. पंचायत समितीचे सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, शंभू नेहे, अरुण शेळके, कृषी उत्पन्न समितीचे सुभाष वायाळ, कृषी अधिकारी आबाजी गोंदके, अशोक धुमाळ, ग्रामविकास अधिकारी, सरोदे, सरपंच चंद्रकांत गोंदके, सखाराम गोंदके, दत्तात्रय गोंदके, सीताराम गोंदके उपस्थित होते. 

सरपंच चंद्रकांत गोंदके यांनी बटाटे नष्ट झाले, भुईमूग, टोमॅटो, भात बियाणे खराब असल्याने या भागातील सुभाष गोंदके, म्हाळूं गोंदके, सोपान गोंदके, सुनील गोंदके, भाग हांडे, अशोक वैराळ आदी  २०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करावे. याबाबतचे निवेदन माजी आमदार वैभव पिचड यांना दिले. 

पिचड म्हणाले, सरकारचे शेतकी खाते बांधावर बियाणे देणार होते. ते दिले तर नाहीच पण अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले. भर पिकावर तांबेरा रोग पडला. बटाटे बियाणे खराब, टोमॅटो व सोयाबीनची तीच अवस्था. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यापुढील काळात गहू, हरबरा, उडीद, हुलगा, वाटाणा लागवडीसाठी सरकारने व कृषी विभागाने मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे. अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल. त्यास सरकार व कृषी खाते जबाबदार राहील. लवकरच आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री विरोधी पक्ष नेते यांना भेटून शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी करू.

संपादन : अशोक मुरुमकर