अपहरण करून खून; पुरावा नष्ट केल्याबद्दल चौघांना आजन्म कारावास

अमित आवारी
Thursday, 20 August 2020

शेतीच्या वादातून अशोक रभाजी शेंडे यांना मारहाण करून ठार करीत मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट केल्याबद्दल आडगाव (ता. पाथर्डी) येथील चौघांना जिल्हा न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये दोषी धरत आजन्म कारावास व 32 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

नगर : शेतीच्या वादातून अशोक रभाजी शेंडे यांना मारहाण करून ठार करीत मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट केल्याबद्दल आडगाव (ता. पाथर्डी) येथील चौघांना जिल्हा न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये दोषी धरत आजन्म कारावास व 32 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

चंद्रकांत अनंत बर्फे (वय 44), अमोल चंद्रकांत बर्फे (वय 20), सुरेश आंदा बर्फे (वय 57), शिवाजी आनंदा बर्फे (वय 45, सर्व रा. आडगाव, ता. पाथर्डी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत राजू रभाजी शेंडे यांनी फिर्याद दिली होती. तीत म्हटले होते, की 11 ऑक्‍टोबर 2018 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भाऊ अशोक रभाजी शेंडे यांनी मला त्यांच्या मोबाईलवरून फोन केला होता. त्या वेळी अशोक व अन्य व्यक्तींमध्ये वाद सुरू असल्याचे ऐकले होते. भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु बोलता आले नाही. त्यानंतर फिर्यादीने शेतात जाऊन चौकशी केली असता अशोक व कोणीही आढळले नाही.

शेतात शोध घेतला असता तेथे माणिक लोंढे यांनी, "तुमच्या भावास वरील चौघांनी मारहाण करून दुचाकीवर बसवून नेले,' असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने शोध घेतला. मात्र कोणी सापडले नाही. नंतर फिर्याद दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक शेंडे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत धारवाडी गावाच्या शिवारात, करंजी ते चिचोंडी रस्त्यालगत सापडला.

पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी केला व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याची सुनावणी न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी-पुरावे, कागदोपत्री पुरावे व सरकारी वकील केदार गोविंद केसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने वरील चौघांना आजन्म कारावास व 32 हजाराचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील केसकर यांना ऍड. राहुल पवार, ऍड. आनंद व्यवहारे यांनी साह्य केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested for kidnapping and murder in Pathardi taluka