esakal | पत्रकार दातीर हत्याकांडातील चौथ्या आरोपीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपीस अटक

पत्रकार दातीर हत्याकांडातील चौथ्या आरोपीस अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राहुरी : येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण व हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातून शिताफीने ताब्यात घेतले.

अक्षय कुलथे (वय 21, रा. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला सोमवारी (ता. 26) फत्तेपूर (उत्तर प्रदेश) जिल्हा न्यायालयाने 72 तासांची ट्रान्झिट रिमांड कस्टडी दिली. उद्या (बुधवारी) रात्री आरोपीसह पोलिस पथक राहुरी पोलिस ठाण्यात पोचेल. आरोपीला पोलिस कोठडी मिळण्यासाठी गुरुवारी राहुरी न्यायालयासमोर हजर केले जाईल.

आरोपीवर यापूर्वी रस्तालूट, चोऱ्या, दरोडा, घरफोड्या, जीवघेण्या हत्यारांनी गंभीर जखमी करणे, दरोड्याची तयारी, अशा विविध कलमांन्वये राहुरी (सहा), कोपरगाव (दोन), राहाता (एक) पोलिस ठाण्यांत एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी दिली.

शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरून सहा एप्रिल रोजी दुपारी सव्वाबारा वाजता पत्रकार दातीर यांचे चार जणांनी अपहरण व जबर मारहाण करून, त्यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर एका मोकळ्या प्लॉटमध्ये टाकला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आरोपी लाला ऊर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25, रा. एकलव्य वसाहत, राहुरी) व तौफिक मुक्तार शेख (वय 21, रा. राहुरी फॅक्‍टरी) या दोन आरोपींना अटक केली.

पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्याकडे तपास वर्ग झाला. त्यांनी मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय 46, रा. वांबोरी, नेवासे) याला नगर- औरंगाबाद रस्त्यावरील एका हॉटेलजवळ अटक केली. मात्र, चौथा आरोपी अक्षय कुलथे पसार होता.

तो चटिया (ता. बिनंदनकी, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) येथे असल्याचा सुगावा लागला. पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, सुनील शिंदे, विकास गुंजाळ यांच्या पथकाने कॉन्स्टेबल फुरकान शेख यांच्या तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे रविवारी (ता. 25) सायंकाळी कुलथे याला ताब्यात घेतले.

बातमीदार - विलास कुलकर्णी

loading image