शुभमंगल सावधान‍! लग्नाच्या बाजारात दिखाऊ माल अन् फसवा धंदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

शुभमंगल सावधान‍! लग्नाच्या बाजारात दिखाऊ माल, फसवा धंदा

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : लग्न (wedding) म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबांचे मिलन, हे वास्तव सध्याच्या काळात बदलत आहे. लग्न जमवताना वधू-वर सूचक मंडळांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बाजार मांडला जात आहे. श्रीगोंदे तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यांत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. गोड आवाजातील मुलींचे फोन व सुंदर दिसणाऱ्या मुलींचा बायोडेटा पाठवून हा भूलभुलैयाचा खेळ खेळला जात आहे. मुला-मुलींची लग्ने जमविताना बापाची मोठी दमछाक होते. त्याचाच गैरफायदा काही लोक, संस्था घेत आहेत. राज्यातील विविध भागांत फ्रॉड विवाह संस्था असून, वधू व वरपित्याची आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत.

अशी होते फसवणूक...

मुलगा अथवा मुलीच्या लग्नाचे परिचयपत्र देत ऑनलाइन नोंदणी केली, की विविध फेक वधू-वर सूचक मंडळांकडून फोन येतात. समोरच्याकडून फेक बायोडेटा पाठविला जातो. त्यातील मुलगा अथवा मुलीचे छायाचित्र अर्थातच सुंदर असते. त्यातील मोबाईल क्रमांक व स्थळ लपविले जाते. छायाचित्रावरून पसंती असेल, तर संबंधित संस्थेची नोंदणी फी जमा केल्यावर पूर्ण बायोडेटा मिळेल, असे सांगितले जाते. या संस्थांची फी दीड हजारांपासून दहा हजारांपर्यंत आहे. फी जमा केल्यावर, दाखविलेल्या स्थळाचे जमले असून, दुसरी चांगली स्थळे दाखविण्याच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीची दमछाक केली जाते. सुरवातीला महिन्याला पंचवीस बायोडेटा पाठविण्याचे आश्वासन दिलेले असते, मात्र इतर ठिकाणांहून जमा केलेले काही बायोडेटा पाठवून नंतर, स्थळे आल्यावर पाठवतो, असे सांगून बोळवण केली जाते.

हेही वाचा: गाव आदर्श करायचं तर तोंडात साखर, डोक्यावर बर्फ हवा!

पैसे कमावण्याचा फंडा...

काही सदस्य एकत्र येऊन सोशल मीडियात वेगवेगळ्या संस्थांचे ग्रुप तयार करतात. तीच स्थळे; मात्र फी वेगवेगळी घेतली जाते. अनेकांनी यासाठी धंदाच मांडला आहे. बहुतेक ठिकाणी मुलींना फोन व पाठपुरावा करण्यासाठी कामावर ठेवले जाते. श्रीगोंदे तालुक्यात काही लोक पैसे जमा करून नंतर संबंधित लोकांचे फोन घेत नसल्याची उदाहरणे घडली आहेत. अनेक जण वर-वधू सूचक केंद्र अथवा संस्था स्थापन न करता ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत वावरतात. ‘मी लग्न जमवून देतो; फी द्या,’ असे थेट आमंत्रण मिळते.

माहीतगार लोक व संस्थांचेच फोन घ्यावेत. मोबाईलवर गोड बोलणाऱ्या मुलींपासून दूर राहावे. मुलीचे लग्न जमविताना २२ अथवा २३व्या वर्षीच स्थळे पाहण्यास सुरवात केली तर अडचणी कमी होतील. पैसे घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहिले, तर समस्या येणार नाहीत. रंग, पगार, जमीन या गोष्टींना पित्यांनी प्राधान्य देण्यापेक्षा, मुले व्यसनाधीन नाहीत ना, याला महत्त्व दिल्यास अशी दलालगिरी बंद होईल.

- डॉ. उषा मोरे, पुणे

हेही वाचा: नगर : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; 4 जणांना मुदतवाढ