कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने नगर जिल्ह्यातील मोफत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद

विलास कुलकर्णी
Friday, 1 January 2021

नगर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व तालुका ग्रामीण रुग्णालयांमध्ये सरकारतर्फे सुरु केलेले मोफत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची (DCHC) रुग्णसेवा आजपासून बंद झाली आहे.

राहुरी (अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व तालुका ग्रामीण रुग्णालयांमध्ये सरकारतर्फे सुरु केलेले मोफत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची (DCHC) रुग्णसेवा आजपासून बंद झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्या घटल्याने, जिल्हा प्रशासनाने सर्व 'डीसीएचसी' बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. यापुढे गरजू कोरोना रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखर्णा यांनी दिले आहेत.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासनातर्फे कोरोना रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड, सात दिवस विलिनीकरण, मोफत औषधोपचार, शरीराचे तापमान ऑक्सिजनची पातळी व रक्ताच्या तपासण्या, छातीचे एक्स-रे, गरजूंना ऑक्सिजन सुविधा, चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली. 

खासगी रुग्णालयांमधून लाखो रुपये खर्च करून, मिळणारी वैद्यकीय सेवा शासनाच्या हेल्थ सेंटरमध्ये मोफत उपलब्ध झाली. मागील सात- आठ महिने गोरगरीब रुग्णांसाठी शासनाचे कोविड हेल्थ सेंटर देवदूत ठरले. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद केले. आता नवीन वर्षात जिल्ह्यातील सर्व कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आले. 

हेही वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीत कपबशी, अंगठी, स्टुल, रोडरोलरसह किटलीसाठी सर्वाधिक मागणी

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोना काळात विस्कळीत झालेली इतर आरोग्यसेवा पूर्वपदावर येणार आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, बाळंतपण, माता-बाल संगोपन सेवा, बाह्यरुग्ण व इतर आंतररुग्ण सेवा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिले आहेत. 

आजपासून बंद झालेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असे : श्री विवेकानंद नर्सिंग होम, राहुरी फॅक्टरी (ता. राहुरी), साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी (ता. राहाता), डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल शेवगाव, सी. आर. एच. पी. जामखेड, शासकीय कोविड हेल्थ केअर सेंटर अकोले, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, ग्रामीण रुग्णालय कोपरगाव.

राहुरी तालुक्यात जून 2020 पासून कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. शासनातर्फे राहुरी फॅक्टरी येथे केलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 163 रुग्णांवर उपचार करून, कोरोनामुक्त करण्यात आले. कोरोना रुग्णसंख्या घटल्याने, आज (शुक्रवार) पासून कोविड हेल्थ सेंटर बंद केले आहे.

- डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Dedicated Covid Health Center closed in Nagar district due to declining number of Corona patients