राहुरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोफत दूध वाटप

विलास कुलकर्णी
Tuesday, 21 July 2020

दुधाला दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

राहुरी (अहमदनगर) : दुधाला दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दुग्धाभिषेक करून, रस्त्यावर दूध ओतण्याऐवजी नागरिकांना एक हजार लिटर दूध मोफत वाटण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता राहुरी तहसील कार्यालयासमोर एक हजार लिटर दूधाचे कॅनसह स्वाभिमानीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, संतोष पवार, अरुण डौले, प्रमोद पवार, आनंद वने, सचिन गडगुळे, सुनील इंगळे, असिफ पटेल, संदीप शिंदे, रवींद्र साळुंके, निलेश शिंदे व इतर शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

मोरे म्हणाले, कोरोना लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत दूध विकावे लागत आहे. केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आज एक दिवसाचे लाक्षणिक दूध बंद आंदोलन केले. रस्त्यावर दूध ओतण्याऐवजी गरीब नागरिकांना मोफत दूध वाटप केले. केंद्र सरकारने 23 जूनला दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा.

दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति किलो ३० रुपये अनुदान द्यावे, दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावी. राज्य सरकारने पुढील तीन महिने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावे. अशा स्वाभिमानीच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत. तर, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही मोरे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free milk distribution from Swabhimani Shetkari Sanghatana in Rahuri