
"आमच्या गावात येऊ नको, तुझे काम थांबव' अशी सूचना केली. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यावरून वातावरण तापले.
अकोले : अकोल्यातील आदिवासींना आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणले जात आहे. आदिवासी समाजाच्या संघटनेला ही माहिती समजल्यानंतर त्यांनी मागील पंधरा दिवसांपूर्वी धर्मांतर सोहळाच हाणून पाडला होता. ही घटना ताजी असतानाच काल वेगळाच प्रकार घडला.
अंधश्रद्धेच्या आडून आदिवासी समाजाचे धर्मांतर करीत असल्याच्या संशयावरून आदिवासी संघटना व ग्रामस्थांनी राजूर येथे एकास घेराव घालत संताप व्यक्त केला.
हेही वाचा - गडाखांमुळे झाली शनिशिंगणापूरची निवडणूक बिनविरोध
राजूरचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी जात ग्रामस्थांना शांत केले. राजूर येथे व्यवसायानिमित्त आलेला एक जण भंडारदरा, तिरडे, बारी येथील आदिवासी समाजाला विशिष्ट धर्मात प्रवेश केल्यास तुमचे आजार बरे होतील, मांसाहार करा, मध घेण्यास हरकत नाही.
मूर्तीपूजा करू नका, लग्नासाठी आमच्या धर्मात यावे लागेल, तसेच राजूरच्या बाजारात आदिवासी महिलांना 40 रुपयांना साडी देऊन त्यांना धर्मांतरासाठी आग्रह करीत असल्याचा आरोप आदिवासी विकास परिषद संघटना व आदिवासी ग्रामस्थांनी राजूर पोलिसांकडे केला.
आदिवासी उन्नतीचे भरत घाणे, राजूरचे सरपंच गणपत देशमुख, सी. बी. भांगरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेश भांगरे, सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग खाडे, बारीचे सरपंच तुकाराम खाडे, पाडोशीचे सरपंच बाळासाहेब साबळे आदींसह दहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी आज संबंधित व्यक्तीस घेराव घालून जाब विचारला.
"आमच्या गावात येऊ नको, तुझे काम थांबव' अशी सूचना केली. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यावरून वातावरण तापले. याबाबत माहिती मिळताच, सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी येऊन गर्दी पांगवली. सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. सर्वांना समज दिली. मात्र, ग्रामस्थ संतापले होते.
पोलिसांचे शांततेचे आवाहन
"आमच्या गावात पाऊल ठेवू देणार नाही. आमच्या गरीब आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अंधश्रद्धेच्या आडून फसविले जात आहे. ते सहन करणार नाही' असा इशारा ग्रामस्थांना दिला. त्यावर पोलिस अधिकारी पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन करीत, संशयित व्यक्तीसह ग्रामस्थांना समज दिली. दरम्यान, बारी येथे आदिवासी संघटनांनी बैठक बोलावली असून, त्यावेळी जनजागृती केली जाणार असल्याचे भारत घाणे यांनी सांगितले.
संपादन - अशोक निंबाळकर