नगरमधील नाट्यगृह उभारणीसाठी राजकीय मंडळींची पाच वर्षांपासून नाटकं

अमित आवारी
Friday, 8 January 2021

2015मध्ये नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले. सरकारने या कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, त्यातील केवळ 60 लाख रुपयेच दिले.

नगर ः सावेडीतील क्रीडा संकुलाच्या जागेवर एक हजार आसनक्षमतेच्या नाट्यगृहाचे बांधकाम महापालिकेने पाच वर्षांपूर्वी सुरू केले. मात्र, निधीअभावी हे काम ठप्प झाले.

हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेला निधीची गरज असून, त्यासाठी महापालिकेने जिल्हा नियोजन समितीकडे पाच कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हाधिकारी सध्या महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त असल्याने महापालिका प्रशासनाच्या आशा वाढल्या आहेत. 

नगरची सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी महापालिकेने 2013-14मध्ये सावेडीतील क्रीडा संकुलाच्या जागी नाट्यगृह उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. सुमारे एक हजार आसनक्षमतेचे हे नाट्यगृह असणार आहे.

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत दिराने बांधली लग्नगाठ

2015मध्ये नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले. सरकारने या कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, त्यातील केवळ 60 लाख रुपयेच दिले.

महापालिकेने या निधीसह शहरात त्यावेळच्या जकात ठेकेदाराकडून दीड कोटींचा निधी मिळवून बांधकाम सुरू केले; पण हे पैसे संपल्यावर तब्बल दीड वर्षे हे काम रखडले. बांधकाम साहित्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रकल्पाची किंमत वाढत गेली. 

कोरोनामुळे लॉकडाउन करण्यापूर्वी महापालिकेने बांधकाम सुरू केले. मात्र, लॉकडाउन व निधीअभावी हे काम बंद पडले. राज्य शासनाकडून निधी मिळत नसल्याने महापालिकेने जिल्हा नियोजन समितीकडून निधीसाठी प्रस्ताव मांडला आहे.

महापालिकेच्या आयुक्‍तपदाचा अतिरिक्‍त पदभार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हाती आलेला आहे. हा निधी मिळाल्यास डॉ. भोसले यांच्या कार्यकाळातच हे नाट्यगृह होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नाट्य रसिकांकडून होत आहे. 

 

नगरची सांस्कृतिक भूक या नाट्यगृहातून पूर्ण होऊ शकते. महापालिकेच्या माध्यमातून हे नाट्यगृह व्हावे. शहराची सांस्कृतिक भूक भागली, तरच हे शहर आरोग्यदायी होईल. यावर्षी तरी निदान हे नाट्यगृह व्हावे, ही अपेक्षा आहे. 
- जयंत येलूलकर, अध्यक्ष, रसिक ग्रूप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funding required for construction of theater in Ahmednagar