गौरी गडाख यांच्यावर सोनईत अंत्यसंस्कार, वहिनीसाहेबांसाठी नेवासा गहिवरला

विनायक दरंदले
Sunday, 8 November 2020

महिलांच्या हितासाठी त्या नेहमी कार्यरत असायच्या. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर संपूर्ण गाव व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या
भावजयी व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या पत्नी गौरी (वय-३५) यांच्यावर
सोनई येथील आमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस तालुक्यातील व जिल्ह्यातील हजारो
ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

गौरी यांच्या निधनाने संपूर्ण सोनईकरांना धक्का
बसला आहे. आज सर्व व्यावसायिकांनी दिवाळी सणाचा आठवडे बाजार व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी चार वाजता बसस्थानकाजवळील अमरधाममध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी झाला. युवा नेते उदयन गडाख यांनी अग्नी दिला. अंत्यविधीस जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

शनिवारी (ता.७) सायंकाळी नगर येथील यशवंत काॅलनीत घडलेली घटना समजल्यानंतर गाव व परीसरात शोककळा पसरली गौरी या नवरात्र सोहळा, संक्रांत उत्सवसह विविध सेवाभावी कार्यासाठी सक्रीय असायच्या. श्री स्वामी समर्थ सेवेकरी म्हणून त्यांचा अध्यात्मिक कार्यातही मोलाचा वाटा होता.

महिलांच्या हितासाठी त्या नेहमी कार्यरत असायच्या. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर संपूर्ण गाव व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे सासू,सासरे,पती,दीर, भाया व दोन मुली आहेत.
त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या तालुक्यात वहिनी नावाने प्रसिद्ध होत्या. सामाजिक कामामुळे त्यांचा लोकसंपर्क होता.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral of Gauri Gadakh at Sonai Ahmednagar News