
नगरला स्त्राव तपासणीसाठी गेला आणि तोपर्यत सोमवारी रात्रीच वृद्धेचा मृत्यु झाला.
पाथर्डी : कोरोनाच्या प्रादूर्भाव वाढतो आहे. दररोज कोणाला कोणाला बाधा होते आहे. कोणी देवाघरी जात आहे. परंतु काही ठिकाणी नातेवाईक या बाधितांवर अंत्यसंस्कार करायलाही घाबरत आहेत. किंवा त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाथर्डीतही अशी माणुसकी गोठवणारी घटना घडली.
शहरातील एका गल्लीतील एक वृद्धा गेल्या पाच ते सात दिवसापासून तापाने आजारी होती. शेजारीच कोरोनाचे रुग्ण आढळल्याने वृद्धेचाही घशातील स्त्राव कोरोना तपासणीसाठी घेण्यात आला.
हेही वाचा - कुकडी, सीनाचा कॅनल धावरणार धुम्माट
नगरला स्त्राव तपासणीसाठी गेला आणि तोपर्यत सोमवारी रात्रीच वृद्धेचा मृत्यु झाला. कोरोनामुळे वृद्धा गेली असी चर्चा शहरात पसरली. त्यामुळे अंत्य़विधीसाठी कोणीही पुढे येईना.
पाथर्डी शहरासह तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या
दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे व भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये माजी नगरसेवक चांद मणियार रुग्णास व त्यांचे कुटुंबीय यांना आधार देण्याचं काम करतात.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी अंत्यविधीसाठी मदत करण्याचे टाळले. महिलेचा एकमेव मुलगा एकाकी पडला. हे समजताच मणियार यांनी अंत्यविधी करण्यासाठी अमरधामकडे धाव घेतली. त्यावेळी अमरधाममध्ये पाथर्डी नगरपरिषदेचे चार कर्मचारी उपस्थित होते. ही सर्व परिस्थिती मनियार यांनी पाहताच स्वतःच्या हाताने सरण रचून अंत्यविधीचे अनेक सोपस्कार त्यांनी पार पाडले.
पालिकेचे मुख्य़ाधिकारी धनंजय कोळेकर, कार्यालयीन प्रमुख अय्युब सय्यद, सोमनाथ गर्जे, पालिकेचे चार सफाई कामगार, माजी नगरसेवक चाँद मणियार व वृद्धेचा मुलगा असे मोजकेच लोक
स्मशान भुमीत गेले. रामनाथ बंग व संतोष गट्टाणी हेही येथे आले.
चाँद मणियार यांनी चिता रचली. वृद्धेच्या मुलाने अग्नीडाग दिला. चाँद मणियार शहरातील लाँकडाऊनच्या काळात अनेक कोरोना रुग्णांना व संशयीतांना आधार देण्याचे काम करीत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात कोवीड केंद्रात गेल्याबद्दल त्यांच्यावर गेल्याच आठवड्यात गुन्हा दाखलही झाला. तरीही मणियार यांचा कोरोना विरोधातला लढा माणुसकी रुपाने समोर आला आहे.
मानवता धर्म
मानवता धर्म हा जगात सर्वश्रेष्ठ अाहे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत. शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांनी कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये सहभागी होऊन
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील रहावे.चाँद मणियार, माजी नगरसेवक.
संपादन - अशोक निंबाळकर