
जलसंधारण मंत्री गडाख गटाच्या विरोधात मागील दोन पंचवार्षिक निवडणूक लढणाऱ्या प्रकाश शेटे गटाला माजी खासदार तुकाराम गडाख ताकद देणार आहेत.
सोनई : सोनई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या विरोधात माजी खासदार तुकाराम गडाखांनी दंड थोपटले आहेत. या निवडणुकीत त्यांच्या "एंट्री'मुळे चुरस निर्माण होणार आहे.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी सोनईची ग्रामपंचायत माजी खासदार तुकाराम गडाखांच्याच ताब्यात होती. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीत त्यांचेच बहुमत असायचे. मात्र, त्यांची एक संस्था अडचणीत आल्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र, आता सोनई ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे डफडे वाजल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.
जलसंधारण मंत्री गडाख गटाच्या विरोधात मागील दोन पंचवार्षिक निवडणूक लढणाऱ्या प्रकाश शेटे गटाला माजी खासदार तुकाराम गडाख ताकद देणार असून, त्यांनी आज हनुमानवाडी, खाण-झोपडपट्टी, दरंदले गल्ली, खोसेवस्तीला भेट देवून शेटे गटाला मतदान करण्याचे आवाहन केले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांची सभा होणार असल्याचे संतोष तेलोरे यांनी सांगितले.
लोकशाहीत विरोधकाची भूमिका महत्वपूर्ण असते. सत्ताधारी मंडळावर नियंत्रण नसल्याने गावाचा बोजावरा उडाला आहे. आहे तो विरोध संपला, तर नवा विरोधक तयार व्हायला दहा वर्ष लागतात. विरोध संपू नये म्हणून पुढे आलो आहे.
- तुकाराम गडाख, माजी खासदार, सोनई , अहमदनगर