कोविडच्या काळात संगमनेरात चाललाय जुगार

आनंद गायकवाड
Thursday, 27 August 2020

पोलिसांनी घटनास्थळाहून 39 हजार 460 रुपये रोख तर 4 लाख 44 हजार 200 रुपये किंमतीच्या सहा दुचाकी व 13 मोबाईल जप्त करण्यात आले.

संगमनेर ः कोरोना प्रादुर्भावाच्या काळात संगमनेर य़ेथे जय जवान चौकातील हॉटेल लकी जवळच्या नवीन बांधकामाच्या आडोशाला, तीरट हा हारजितीचा जुगार खेळणाऱ्या 23 जणांवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रशासन त्यांच्या स्तरावर कारवाई करीत असताना, शहरातील जय जवान चौकात काही जण स्वतःच्या फायद्यासाठी तिरट हा हारजितीचा जुगार पैसे लावून खेळत असल्याच्या माहितीवरुन, शहर पोलिसांच्या पथकाने आज दुपारी दिड ते तीन या सुमारास छापा टाकला.

हेही वाचा - पारनेर मनसेची राजकारणात उडी

या वेळी निखील शहा, राजेंद्र कानवडे, सुनिल धात्रक, गणेश धामणे, विजय अरगडे आदींसह 21 जण मिळून आले. तर पोलिस पथकाची चाहुल लागताच रवी म्हस्के व गोविंद दासरी हे दोन जण फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळाहून 39 हजार 460 रुपये रोख तर 4 लाख 44 हजार 200 रुपये किंमतीच्या सहा दुचाकी व 13 मोबाईल जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पोलिस नाईक सचिन आडबल यांच्या फिर्यादीवरुन, संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी पुढील तपास करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambling took place in Sangamnera during the time of Kovid