गांधींची टिळकांसाठी सभा, महिलेने दिली हातातील सोन्याची पाटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधी यांना संगमनेरांकडून ताम्रपट

गांधींची टिळकांसाठी सभा, महिलेने दिली हातातील सोन्याची पाटली

संगमनेर : कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर शहराला महात्मा गांधी यांनी दिलेल्या भेटीला शुक्रवारी (ता. 21) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी शहरात टिळक स्वराज फंडासाठी सभाही घेतली होती. त्यांना नगरपालिकेने दिलेला ताम्रपत्र त्या आठवणींना आजही उजाळा देत आहे. (Gandhiji had held a meeting in Sangamner for the Tilak Fund)

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर देशातील कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे गेले. टिळकांच्या कामाला पुढे नेण्यासाठी त्यांनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली होती. या कामासाठी आखलेल्या देशव्यापी दौऱ्याचा भाग म्हणून महात्मा गांधी यांनी संगमनेर शहराला 21 मे 1921 रोजी भेट दिल्याची माहिती संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक आणि विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी दिली.

हेही वाचा: आर.आर. पाटलांसोबत तुलना होणारे नीलेश लंके नेमके आहेत तरी कोण?

संगमनेरमधील तत्कालीन पुढारी काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबूराव ठाकूर, शंकरराव संत (वकील) आदींच्या निमंत्रणावरून गांधीजी नाशिकहून संगमनेरमध्ये दाखल झाले होते. त्या दिवशी महादेवभाई देसाई यांच्या समवेत ते शहरातील श्रीचंद वीरचंद गुजराती यांच्याकडे मुक्कामाला थांबले होते. तेव्हापासून हा परिसर गांधी चौक म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या दिवशी- 22 मे रोजी संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात गांधीजींची जाहीर सभा झाली.

नागरिकांच्या वतीने गांधीजींना या सभेत ताम्रपत्रावर महादेव शिंदे या कारागिराने कोरलेले मानपत्र देण्यात आले. त्यावर लालसाहेब पीरजादे, गणेश सराफ, बाबूराव ठाकूर, शिवनारायण नावंदर व तुकाराम निऱ्हाळी यांची नावे कोरलेली आहेत. हे मानपत्र गांधीजींनी त्यांची आठवण म्हणून पुन्हा नगरपालिकेकडे सुपूर्द केले. त्यानंतर ते कोपरगावमार्गे येवला येथील सभेसाठी रवाना झाले. या भेटीस आज (ता. 21) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. नगरपालिकेतील ताम्रपट या सभेच्या आठवणींना उजाळा देत आहे.

महिलेचे औदार्य

सभेत महात्मा गांधी यांनी टिळक स्वराज्य फंडासाठी देणगी देण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत संगमनेरकरांनी मुक्तहस्ते देणग्या दिल्या. द्वारकाबाई मोहनीराज देशपांडे या गृहिणीने भर सभेत आपल्या हातातली सोन्याची पाटली टिळक स्वराज्य फंडासाठी दिली. (Gandhiji had held a meeting in Sangamner for the Tilak Fund)

loading image
go to top