आर.आर. पाटलांसोबत तुलना होणारे नीलेश लंके नेमके आहेत तरी कोण?

पारनेर तालुक्यातील उभारले आहे ११ बेडचे कोविड सेंटर
nilesh lanke
nilesh lankeE sakal

अहमदनगर ः पारनेर तालु्क्यातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या सामाजिक कामाचे महाराष्ट्र कौतुक करीत आहे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते अल्पावधीतच पक्षश्रेष्ठींचेही लाडके झालेत. महाराष्ट्रातील साखर कारखाने तसेच पक्षातील नेत्यांनी कोविड निवारणासाठी मदत करावी, असे आवाहन पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांना आवाहन करावं लागलं. तेव्हा मदतीचा ओघ सुरू झाला. परंतु त्या अगोदर स्वतःहून पवारांच्याच नावाने तब्बल अकराशे बेडचे कोविड सेंटर लंके यांनी उभारून सामान्य माणसाला मदतीचा हात दिला. (MLA Nilesh Lanke is being compared with RR Patil's personality)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar), खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule), आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांनाही लंके यांच्या कामाचं कौतुक आहे. लंके यांचा साधेपणा या अगोदरच महाराष्ट्राने अनुभवला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hajare), आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीही लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

सोशल मीडियावर सध्या लंके यांचाच बोलबाला सुरू आहे. ते पारनेर-नगर तालुक्याचे आमदार असले तरी महाराष्ट्रभर त्यांचे चाहते आहेत. कै. आर. आर. पाटील यांच्यासोबत त्यांची तुलना होऊ लागलीय. कोरोना काळातील कामामुळे लंके मीडियाच्या केंद्रस्थानी आलेत. जे साखर कारखानदारांना, पिढीजात राजकारण करणाऱ्यांना जमलं ते लंके यांनी करून दाखवल्याने त्यांची वाहवा होते आहे.

nilesh lanke
MLA Nilesh Lanke Viral Video: "दमदार आमदार" निलेश लंके यांचा हा व्हिडीओ व्हायरल

शिक्षकाचा मुलगा

नीलेश लंके पारनेर तालुक्यातील हंगा गावचे. वडील शिक्षक तर आई गृहिणी. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची. राजकारणाचा वारसा वगैरे असण्याचा संबंध नाही. सध्या त्यांची पत्नी राणीताई या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. त्या पूर्वी पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती होत्या. घरात पदे आली तरी त्यांची जीवनशैली पूर्वीप्रमाणेच राहिली. श्रीमंती वाढत मात्र ती लोकसंग्रहाची.

साधी राहणी, चोवीस तास लोकांसाठी

लंके यांनी दहावीनंतर आयटीआय केले. त्यानंतर ते एका कंपनीत नोकरीला लागले. मात्र, त्या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी चहाची टपरी टाकली. परंतु ती कार्यकर्ते आणि मित्रांना चहा पाजता पाजता पुरती डुबून गेली. सुरूवातीपासून त्यांना गरिबीचे चटके बसले. त्यामुळे त्यांनी बडेजाव केला नाही. आताही ते साध्या घरात राहतात. साधा नगरसेवक झाला तरी इमल्यावर इमले चढतात. लंके यांना कशाचाच सोस नाही. त्यांच्या साधेपणामुळे आणि केव्हाही कुठेही उपलब्ध होण्याच्या वृत्तीमुळे ते प्रसिद्ध पावत आहेत. आताही ते कोविड सेंटरमध्येच असतात. तेथेच मुक्कामीही असतात. त्यांची तुलना आर.आर. आबांसोबत होऊ लागलीय. राष्ट्रवादीचा हा आमदार साहेब आणि अजितदादांच्या जवळचा आहे. सुप्रिया सुळेही त्यांच्या कामावर खुश आहेत. कामाच्या हटके स्टाईलमुळेच त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. त्यांची कोणतीही बातमी किंवा यु ट्यूबवरील व्हिडिओ लाइक्स किंवा व्ह्यूज देऊन जाते. परजिल्ह्यातून त्यांना मदत येते, अशी माहिती सोशल मीडिया ग्रुप सांभाळणारे पत्रकार श्रीकांत चौधरी देतात.

नीलेश लंके आहेत कडवे शिवसैनिक

राष्ट्रवादीत हिरो ठरलेले लंके यांची पाळेमुळे आहेत शिवसेनेत. कै. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे हे त्यांचे आदर्श. हायस्कूलमध्ये असल्यापासून ठाकरे विचाराने ते भारावले. कै. ठाकरे हे एकदा पारनेरची सभा आटोपून परतत असताना हंगा गावात त्यांचा सत्कार ठेवला होता. त्या गर्दीत घुसून एका तरूणाने ठाकरे यांच्या चरणावर डोके ठेवले. ठाकरे यांनीही त्या तरूणाला उठवत आशीर्वाद दिले. तेव्हापासून लंके आणखीच झपाट्याने शिवसेनेचे काम करू लागले. गावात शिवसेनेची सत्ता आणायची असा त्यांनी चंग बांधला. तत्कालीन तालुकाध्यक्ष सबाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार केले, आणि निवडूनही आणले. लंके यांनीही त्या निवडणुकीत अर्ज दाखल केला होता. परंतु वय कमी असल्याने तो बाद झाला. तेव्हापासून त्यांच्यातील नेतृत्वगुणाची चमक लोकांनी दिसली.

nilesh lanke
शिवसेनेचे नेते विजय औटी पुन्हा राजकारणात सक्रीय होणार

अंगी संघटन कौशल्य असलेल्या या तरूणाला पक्षाने सुपा गणप्रमुख केलं. पुढे त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली. मात्र, त्या चुरशीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीने त्यांना तालुक्यात ओळख मिळवून दिली. सुपा एमआयडीतील एजंटांची टोळी त्यांनी मोडीत काढली. रोजगार मिळवून दिल्याने ते तरूणांच्या गळ्यातील ताईत झाले. पुढे गावची ग्रामपंचायत ताब्यात आली नि सरपंचपदही मिळाले. तालुकाप्रमुखपदही चालून आले.

सन २०१२ हे वर्ष लंके यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. सुपा गणातून पत्नी राणीताई यांना लोकांनी बहुमताने विजयी केले. त्या उपसभापतीही झाल्या. त्याचीच पुनरावृत्ती २०१७च्या निवडणुकीत झाली. ती निवडणूक होती जिल्हा परिषदेची. सर्वाधिक मतांनी निवडणूक आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लंके यांनी लक्ष वेधून घेतले. कामामुळे लंके यांच्याकडे लोकसंग्रह वाढत होता. पक्षात आणि समाजात त्यांचे महत्त्व वाढू लागले. विशेषतः तरूणांची फळी त्यांच्यामागे उभी राहिली.

विजय औटी यांच्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. औटी यांनी विजयाची हॅटट्रीक केली होती. तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना विधानसभेचे उपसभापतीपदही मिळाले. औटी यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. वक्तशीरपणा आणि शिस्तीला ते जास्त महत्त्व देतात. पक्षातही त्यांचे वजन असल्याने चौथ्यांदा त्यांना तिकीट मिळणार होते. त्यांच्या सर्वच निवडणुकीत लंके यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे मतदारसंघाचा त्यांना आवाका आला होता. लंके यांनाही तरूणांकडून विधानसभा लढवण्यासाठी गळ घातली जाऊ लागली. दरम्यान, औटी आणि लंके यांच्यात विविध कारणांवरून खटके उडू लागले. मार्च २०१८मध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची पारनेरमध्ये सभा होती. त्यात गोंधळ झाला. लंके हेच या गोंधळाला जबाबदार असल्याची खबर मातोश्रीवर पोहचवली गेली. त्यामुळे लंके यांचे ६ मार्च रोजी निलंबन झाले. चारच दिवसांनी म्हणजे १० मार्चला तब्बल ५० हजार युवकांनी हंगा येथे जाऊन लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमातून त्यांच्या आमदारकीची पायाभरणी झाली.

प्रतिष्ठानची स्थापना

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नीलेश लंके प्रतिष्ठान जन्माला आले. अल्पावधीतच नगर, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक जिल्ह्यात शाखा उघडल्या गेल्या. सर्व काही लोकांसाठी असे त्यांनी कामाचे स्वरूप ठेवले. मतदारसंघातील लोकांना देवदर्शनसारख्या उपक्रमाने त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. कृषी प्रदर्शन, रोजगार मेळावे त्यांच्या राजकीय जीवनाला बळकटी देणारे ठरले. अंत्यविधी, दशक्रिया विधी, जागरण गोंधळाच्या कार्यक्रमालाही ते लोकांच्या दारात जात. आमदार झाल्यावरही त्यात खंड पडला नाही.

राष्ट्रवादीला पारनेर तालुक्यात एका खंबीर नेत्याची उणीव जाणवत होती. त्यांनी लंके यांच्या कामाची दखल घेत २०१९ रोजी प्रवेश दिला. त्यानंतर राष्ट्रवादीसाठी त्यांनी वाहून घेतले. जनसंवाद यात्रा गावोगावी पोहचवली. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीसाठी फारसे चांगले वातावरण नव्हते. लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढला.

विजय औटी-नीलेश लंके सामना

विधानसभेला राष्ट्रवादीने नीलेश लंके यांना तिकीट दिले. त्यांचा सामना शिवसेनेच्या विजय औटी यांच्यासोबत झाला. लंके यांना पहिल्या दिवसापासून प्रतिसाद मिळत गेला. लोकांनी त्यांना मतेही आणि खर्चासाठी पैसेही. महाराष्ट्रात हल्ली असे उदाहरण पाहायला मिळत नाही. एक कोटी रूपये देऊन लोकांनी त्यांना ६१ हजार अशा प्रचंड मतांनी विजयी केलं. निवडून आल्यानंतरही त्यांनी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. पारनेरच्या लोकांसाठी सोमवारी तर मंगळवारी नगरमध्ये जनता दरबार असतो. सून नांदत नाही, जावई त्रास देतो, अमक्याने पाईपलाईन अडवलीय अशा तक्रारीही त्यांच्या दरबारात येतात. लोक हेच माझे सांगाती असे समजून ते काम करीत आहेत. भाळवणीत त्यांनी अकराशे बेडचे कोविड सेंटर उभा केलंय. तेथे महाराष्ट्रभरातील लोकं उपचार घेत आहेत.

लोकसभेसाठी चर्चा

नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, त्यांना तिथे तगडा उमेदवार मिळत नाही. भाजपचे दिलीप गांधी यांच्यामुळे बालेकिल्ला बनला. आता विखे घराण्यातील डॉ. सुजय विखे पाटील हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विखे-पवार वादाला याच मतदारसंघातील उमेदवारीची किनार आहे. पारनेर याच मतदारसंघात येत असल्याने नीलेश लंके यांच्या नावाची आतापासून चर्चा होऊ लागलीय. जिल्हाभर तसेच राज्यभर लंके यांची हवा असल्याने राष्ट्रवादीच्याने नेत्यांना पुढची लोकसभा निवडणूक आतापासूनच सोपी वाटू लागलीय.(MLA Nilesh Lanke is being compared with RR Patil's personality)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com