Gharkul yojana 2023 : घरकुलासाठी अंधाच्या शासनदारी चकरा Gharkul yojana 2023 ahmednagar administration Govt Received Gharkul | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar news

Gharkul yojana 2023 : घरकुलासाठी अंधाच्या शासनदारी चकरा

संगमनेर : तीन माणसांच्या कुटुंबाला राहण्यासाठी हक्काचे शासकीय घरकुल मिळावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून अंध व्यक्ती शासकीय कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही पदरी निराशाच आली. चंद्रमौळी झोपडीत टपकणारे पावसाचे पाणी बाहेर काढत आजवर तग धरून राहिलेल्या या व्यक्तीच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्याचे नाव काही घेईनात.

तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी या दुर्गम गावातील पेमरेवाडी येथील निवृत्ती पोखरकर (वय ३६) या जन्मांध युवकाच्या नशिबातील अंधकार संपण्याचे नाव घेईना. नावाला शेती असलेल्या या कुटुंबाचा चरितार्थ मोलमजुरीवर चालतो. बाभळेश्वर (ता. राहाता) येथील विखे पाटील विद्यालयात दहावीपर्यंत शिकलेले निवृत्ती अहमदाबादमधील (गुजरात) बिस्किटांच्या कंपनीत पॅकिंग विभागात नोकरी करीत होते.

दरम्यानच्या काळात २०१३ मध्ये त्यांच्या विवाहित भावाचा मृत्यू झाला. त्याच्या लहान मुलीची जबाबदारी निवृत्ती यांच्यावर पडली. त्यानंतर वडील भानुदास यांचा मृत्यू झाल्याने आईसाठी नोकरी सोडून त्यांनी पेमरेवाडी गाठले.

वडील हयात असल्यापासून या कुटुंबाचा शासकीय घरकुल मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आईनंतर आता गेल्या काही वर्षांपासून ते स्वतः प्रयत्न करीत आहेत. स्थानिक पातळीवर आजवर केवळ आश्वासने मिळाली. सहावीत शिकणाऱ्या निराधार नातीसह अंध मुलाला त्यांची ६२ वर्षांची आई मोलमजुरी करून सांभाळते आहे.

राहण्यासाठी घर, पुतणीचे शिक्षण व इतर खर्चाची तरतूद उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नसलेल्या या कुटुंबाचा खचून न जाता प्राप्त परिस्थितीशी लढा सुरू आहे. नुकतीच पुतणीला सोबत घेऊन निवृत्ती पोखरकर यांनी संगमनेर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची भेट घेतली. त्यांनी सर्व कैफियत जाणून घेत, सर्वतोपरी साहाय्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

शासनाकडून मिळणाऱ्या मासिक एक हजार रुपयांत सर्व खर्च भागत नाही. सुमारे १३ वर्षांपासून घरकुलाच्या यादीत नाव असल्याच्या आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. पुतणीलाही शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.

- निवृत्ती पोखरकर,

२०२३-२४ या आर्थिक वर्षातील घरकुलात प्राधान्याने पोखरकर यांचा समावेश करणार आहोत. तसेच, त्यांच्या निराधार पुतणीला संबंधित प्रमाणपत्र देऊन तिला महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी भाग्यश्री शेळके यांना या कुटुंबाचे पालकत्व दिले असून, सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्या मदत करणार आहेत.

-अनिल नागणे, गटविकास अधिकारी