
घोडेगाव (ता. नेवासे) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेल्या सतरा किलो चांदीच्या मखराची चोरीचा तपास लागत नसल्याने आज नगर- औरंगाबाद रस्त्यावर ग्रामस्थांनी अर्धा तास रास्तारोको अंदोलन करुन चुल व गाव बंद ठेवले.
सोनई (अहमदनगर) : घोडेगाव (ता. नेवासे) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेल्या सतरा किलो चांदीच्या मखराची चोरीचा तपास लागत नसल्याने आज नगर- औरंगाबाद रस्त्यावर ग्रामस्थांनी अर्धा तास रास्तारोको अंदोलन करुन चुल व गाव बंद ठेवले.
घोडेश्वरी मंदीरातील १० लाख ३७ हजाराच्या सतरा किलो चांदीच्या मखराची १८ नोव्हेंबरला चोरी झाली होती. १२ दिवस उलटूनही चोरीचा तपास न लागल्याने आज भाविक व ग्रामस्थांनी अखेर अंदोलनाचा मार्ग पत्करला. सकाळी १० वाजता महिला भाविकांसह ग्रामस्थ रस्त्यावर ठाण मांडून बसले. रास्ता रोको अंदोलन अर्धा तास चालले.
ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २०१६ मध्ये १७ किलो चांदी वापरुन चार भागामधे चांदीच्या पत्र्यावर कोल्हापूर येथील कारागिरांनी सुंदर नक्षीकाम करुन मखर तयार केली होती. राहुरी येथील दादासाहेब भडकवाल यांंच्या मार्गदर्शनाखाली चांदीचे काम करण्यात आले होते. चांदीच्या मखराने श्री घोडेश्वरी देवी मखर सुशोभित दिसत होते.अज्ञात चोरट्यांनी येथील मखराची चोरी केल्यानंतर सर्वत्र नाराजीचा सूर पसरला होता.
रास्ता रोकोमुळे नगर- औरंगाबाद रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केल्यानंतर ग्रामस्थांनी अंदोलन मागे घेतले.सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सचीन बागुल यांनी बंदोबस्त ठेवला होता.
संपादन : अशोक मुरुमकर