घोडेगाव क्रमांक एक सेवा सोयायटी निघाली अवसायनात

संजय आ. काटे
Saturday, 8 August 2020

या सोसायटीचा चालू तोटा 20 लाख 33 हजार 337 रुपये अाहे. संचित तोटा 1 कोटी 89 लाख 27 हजार रुपये आहे. तसेच 1 कोटी 78 लाख 35 हजार 598 रुपये एवढी अनिष्ट तफावत या सोसायटीत दिसून येत आहे.

श्रीगोंदे : सन 1961 मध्ये स्थापन झालेली घोडेगाव नंबर एक विविध कार्यकारी सेवा संस्थेमध्ये लाखो रुपयांचे अपहार आणि गैरव्यवहार झाल्यामुळे श्रीगोंदा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी ही सोसायटी अवसायनात (विसर्जित ) काढल्याचा आदेश जारी केला आहे.

खेडकर यांनी आदेशात म्हटले आहे की, या सोसायटीचा चालू तोटा 20 लाख 33 हजार 337 रुपये अाहे. संचित तोटा 1 कोटी 89 लाख 27 हजार रुपये आहे. तसेच 1 कोटी 78 लाख 35 हजार 598 रुपये एवढी अनिष्ट तफावत या सोसायटीत दिसून येत आहे.

या सोसायटीमध्ये कायदा, कानू, उपविधी, सहकारी संस्थां व बँकांचे आदेश पाळले जात नाहीत. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये ही सोसायटी अवसायनात काढण्यात आली आहे.
सन 2018-19 या आर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालामध्ये 6 कर्ज खात्यात 22 लाख 5 हजार 700 रुपये एवढ्या रकमेची अफरातफर/ गैरव्यवहार झाला असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा - पारनेरचा जवान आसाममध्ये हुतात्मा

विनायक भानुदास मचे व इतर 4 तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, संस्थेचे चेअरमन, सचिव, संचालक गंगाराम भानुदास मचे व आढळगाव शाखेचे शाखाधिकारी यांनी 8 कर्जदार यांच्या नावावर संगनमताने 18 लाख 86 हजार 500 रुपये एवढे बोगस कर्ज काढलेले अाहे. कर्जदारांच्या कोणत्याही कागदपत्रांवर सह्या नाहीत.

घोडेगाव येथील बापूराव भानुदास मचे व इतर 77 सभासदांनी घोडेगाव सेवा सोसायटीबद्दल बोगस व खोटे कर्ज काढण्याच्या तक्रारी करून तोट्यात गेलेली ही संस्था अवसायनात काढावी, अशी मागणी केली आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांनी लोकल सचिव सचिन गंगाराम मचे यांचे सह्यांचे अधिकार 20 फेब्रुवारी 2020 पासून काढलेले असताना त्यानंतरही त्यांनी बेकायदेशीर आणि अनाधिकृत कामकाज केले.

घोडेगाव नंबर 1 ही संस्था वैद्यनाथ अपात्र संस्था आहे. ती आर्थिक सक्षम होऊ शकत नसल्याने अवसायनात (विसर्जित) घेणे शिवाय दुसरा पर्याय नाही. त्याच गावात दुसरी एक विविध कार्यकारी सेवा संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असल्याने बहुतांशी खातेदार तिकडे व्यवहार करीत असतात. त्यामुळे संस्था अवसायनात (विसर्जित) घेण्याची गरज आहे. ही संस्था लेखापरीक्षण वर्ग 'ड ' असल्याने अवसायनात घेणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghodegaon number one service society went into liquidation