esakal | कुठल्याही चोरीत पोलिस बापाला उचलतात म्हणून मन फौजदार व्हावानु छ...दहावीला डिस्टिंक्शन मिळवणाऱ्या भाग्यश्रीचा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

The girl from the Pardhi community wants to be a faujdar

तालुक्यात कुठेही चोरी झाली की वडीलांची रवानगी तुरुंगात होत किंवा चौकशीसाठी तरी बोलावणे होतं. या सगळ्याचा आम्हाला त्रास होत असे. यावर उपाय म्हणून...

कुठल्याही चोरीत पोलिस बापाला उचलतात म्हणून मन फौजदार व्हावानु छ...दहावीला डिस्टिंक्शन मिळवणाऱ्या भाग्यश्रीचा संकल्प

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : दहावीचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात नव्वद, पंच्यानव अगदी शंभर टक्के गुण मिळवणारेही विद्यार्थी आहेत. परंतु या सगळ्यात उठून दिसते ती ७९ टक्के गुण मिळवणारी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीची भाग्यश्री भोसले.

ती ज्या समाजात जन्माला आली त्या पारधी समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का आजही पुसलेला नाही. म्हणून तिचं शिक्षण काय जिणंच मुश्कील झालेलं. त्याही परिस्थितीत ती शिकली. आणि विशेष गुणवत्ता घेऊन दहावी उत्तीर्ण झाली.

हेही वाचा - आघाडी म्हणजे एकाच नवऱ्याच्या दोन बायका

या कामगिरीबद्दल भाग्यश्रीचा लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे, सतीश ओहोळ, राहुल साळवे यांनी तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. पुढील शिक्षणासाठी प्रेरणाही देत कौतुकाची थाप दिली.

आपल्या शिक्षणाच्या चित्तरकथेबद्दल भाग्यश्री म्हणते, "अठरा विश्व दारिद्र असलेल्या घरात माझा जन्म झाला. समाजाला लागलेला गुन्हेगारीचा शाप पिच्छा सोडत नव्हता. तालुक्यात कुठेही चोरी झाली की वडीलांची रवानगी तुरुंगात होत किंवा चौकशीसाठी तरी बोलावणे होतं. या सगळ्याचा आम्हाला त्रास होत असे. यावर उपाय म्हणून आई राणी आणि वडील नमक भोसले यांनी गावठाणातील शासकीय जमिनीवर संसार थाटला." 

"आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ अशी सहा भावंडे. त्यात रोजगाराचे साधन नसल्यामुळे चांगले शिक्षण घेणे तर सोडाच पण दोनवेळ पोटभर जेवण मिळायचीसुद्धा भ्रांत. यावर उपाय म्हणून माझ्या आई वडिलांनी आम्हा बहिणींना मागासवर्गीय मुलींची शासकीय निवासी शाळा मांडवगण येथील आश्रमशाळेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले." 

चांगले गुण असल्यामुळे आम्हा तीन बहिणींना त्या शाळेत प्रवेश मिळाला. आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही त्या संधीचे सोने करण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो. हे आज आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहुन वाटत असले तरी खरी सत्वपरीक्षा अजुन पुढे आहे, याची जाणीव आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीच्या वाट्याला आम्हाला झालेला त्रास येऊ नये. यासाठी मन फौजदार व्हावानु छ...

- भाग्यश्री भोसले, पारधी समाजातील गुणवंत विद्याथिनी.

संपादन - अशोक निंबाळकर