राम शिंदे म्हणतात, आघाडी म्हणजे एकाच नवऱ्याच्या दोन बायका, कारभारी बसलाय घरात

नीलेश दिवटे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले अाहे. ते कधी कोसळेल हे सांगता येत नाही. सध्या कोरोनामुळे दुधाला रास्त भाव मिळण्याबरोबरच इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे.

कर्जत: एका नवऱ्याच्या दोन बायका असे हे तिघाडीचे सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांचे काहीही घेणेदेणे नाही. त्यांचे सर्व आटोपले आहे. कारभारी घरात बसून प्रपंच कसा चालणार.

हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले अाहे. ते कधी कोसळेल हे सांगता येत नाही. सध्या कोरोनामुळे दुधाला रास्त भाव मिळण्याबरोबरच इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू,  असा इशारा प्रा. राम शिंदे यांनी दिला.

तालुक्यातील माहीजळगाव येथे दूध दरवाढ व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाचा निषेध म्हणून प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक घालून काही काळ रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - गाढ झोपेत असतानाच आले पाणी

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, उपसभापती प्रकाश शिंदे, रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, ज्येष्ठ नेते सुनील यादव, अंगद रुपनर, भानुदास हाके, प्रकाश कदम, राजेंद्र गायकवाड, रावसाहेब कदम, नानासाहेब तोरडमल, संतोष गलांडे, पप्पू धोडाद, नंदलाल काळदाते आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, या आघाडी सरकारने गेल्या सात आठ महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारे कोणतेच निर्णय घेतले नाहीत. दूध घेताना कमी भावात घेतले जाते. मात्र, नंतर वाढीव दराने विक्री केली जाते. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. युरिया वेळेवर नाही. विजेचा खेळखंडोबा झाला, असे हे निष्क्रिय सरकार आहे.

या वेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Shinde says, Aghadi means two wives of the same husband