ऊसउत्पादकांसाठी खुशखबर, अखेर साईकृपा कारखान्याचा बॉयलर पेटला

संजय आ. काटे
Wednesday, 3 February 2021

विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, ""अडचणींचा डोंगर होता; मात्र अनेकांनी सहकार्याचे हात पुढे केले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने कारखाना सुरू करीत आहोत.

श्रीगोंदे : ""मोठ्या अडचणीतून मार्ग काढत आज हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ झाला. आठ दिवसांच्या आत कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करणार असून, प्रतिदिन साडेसात हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेने कारखाना चालवून, यातून तयार होणारी रिफायनरी साखर निर्यात करून शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत,'' अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली. 

पाचपुते कुटुंबाने खासगी तत्त्वावर काही वर्षांपूर्वी सुरू केलेला हा कारखाना पुन्हा एकदा सुरू होत आहे. गेल्या वर्षी उसाअभावी तालुक्‍यातील सगळेच कारखाने बंद राहिले. यंदा अन्य कारखान्यांचे अर्धे गाळप होत आले असताना, अडचणींतून मार्ग काढत अखेर साईकृपा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल प्रशासनाने टाकले.

हेही वाचा - सेंट्रल बँक झाली उदार, अडीच कोटींचे कर्जवाटप

आजच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमाला आमदार बबनराव पाचपुते, अध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, व्यवस्थापकीय संचालक राजकुमार ढमढेरे, शिरूरचे उद्योजक रणजित पाचर्णे, कार्यकारी अधिकारी कैलास जरे, शिवाजी निंबाळकर, युवराज धनगर, राजाराम बांदल, सुभाष डुबुले, संजय मोरे, तुकाराम कदम, दादाराम ओहळ आदी उपस्थित होते. 

विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, ""अडचणींचा डोंगर होता; मात्र अनेकांनी सहकार्याचे हात पुढे केले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने कारखाना सुरू करीत आहोत. आज बॉयलर अग्निप्रदीपन केले असून, आठ दिवसांच्या आतच कारखान्याचे प्रत्यक्ष गाळप सुरू होईल. कारखान्याचे सहवीजनिर्मिती व आसवनी प्रकल्पही लगेच सुरू होतील.'' 

पुढच्या हंगामासाठी ही ट्रायल

""पुढच्या हंगामाच्या दृष्टीने ही "ट्रायल' असली, तरी रोज साडेसात हजार मेट्रिक टनाची क्षमता असल्याने, याच गतीने कारखान्याचे गाळप करणार आहोत. कारखान्याची महत्त्वाची रोहित्रे चोरीला गेल्याने गाळपाला उशीर होत असला, तरी हार्वेस्टिग यंत्रे व ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या तयार आहेत.

सगळे कामगार, अधिकारी हजर

कारखान्यातील सगळे कामगार व अधिकारी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचा शब्द दिला आहे. आपणही शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका ठेवली असून, गाळप हंगाम सुरू करताना महत्त्वाच्या घोषणा करणार आहोत,'' असे पाचपुते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for sugarcane growers, the boiler of Sai Kripa factory caught fire