मला रिटायर व्हायचंय : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagatsingh Koshiyari

मला रिटायर व्हायचंय : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी

अहमदनगर - राज्यपालांना सही करण्याचेच काम जास्त असते. विधायक कामातून आनंद मिळवायचा असल्याने, मला रिटायर व्हायचे आहे, परंतु केंद्र सरकार होऊ देत नाही, अशी मिस्कील टिप्पणी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केली.

स्नेहालय संस्थेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्नेहालय पुनर्वसन संकुलात आयोजित युवा प्रेरणा शिबिराचे उद्‌घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘स्नेहालय’चे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, उपाध्यक्ष अरुण शेठ, पश्‍चिम बंगालचे सेवानिवृत्त मेजर जनरल जीवन कनाई दास, मामून अख्तर, मनीषा लढ्ढा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, की जीवनात अनेक ठिकाणी जाण्याची वेळ आली. एका बाजूला गगनचुंबी इमारती आहेत तर दुसऱ्या बाजूला काहींना राहण्यासाठी घरे नाहीत, अशी दरी आहे. समाजातील सर्व घटकांची प्रगती झाली पाहिजे. देशाची १९४७ मधील विभागणी झाली. परंतु, शेजारील बांगलादेशाला १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका भाषणात म्हणतात, की देशात संघर्षयात्रा खूप झाल्या आहेत, आता स्नेहयात्रा काढण्याची गरज आहे. समाजातील एकोपा आणखी वृद्धिंगत होण्याची गरज आहे. माजी राज्यपाल आचार्य हे निवृत्त होऊन विविध राज्यातील संस्कृती एकमेकांना समजण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करतात. सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी प्रयत्नशील असतात, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी खूप मोठे काम उपेक्षितांसाठी केले आहे. त्यांना राज्यपाल बनविले पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग प्रशासनाला होऊ शकतो, असेही कोश्‍यारी म्हणाले.

‘कोर्ट आम्हाला उलटे करते’

स्नेहालयातील या कार्यक्रमास काही सेवानिवृत्त न्यायमूर्तीही उपस्थित होते. त्यांचा उल्लेख राज्यपालांनी केला. काही वेळेस कोर्ट आम्हाला उलटे करतात, अशी टिप्पणी करून त्यांनी न्यायालयाच्या अधिकारांबद्दल आदर व्यक्त केला.

Web Title: Governor Bhagat Singh Koshyari Inaugurated The Youth Motivation Camp Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..