
दिवस-रात्र गरम उबदार कपडे परिधान करून, नागरिक दैनंदिन कामकाज करीत आहेत.
राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात कडाक्याची थंडी पडली आहे. दिवस-रात्र गरम उबदार कपडे परिधान करून, नागरिक दैनंदिन कामकाज करीत आहेत. अशा थंड वातावरणात तालुक्यातील 83 पैकी 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
राजकीय वातावरण तापू लागले आहे. गट-तट एकत्र करून, रुसवे-फुगवे काढण्यात गाव पुढाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. काही गावांमध्ये बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे, त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. विरोधी भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात काही ग्रामपंचायती आहेत. खासदार सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांचा काही गावांमध्ये वरचष्मा आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत तयार झालेले गट-तट शेवटपर्यंत नेत्यांच्या पाठीशी राहतात. असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे, ग्रामपंचायतींची सत्ता राखण्यासाठी व विरोधी गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायती खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत वरिष्ठ नेते थेट भाग घेत नाहीत. परंतु, आपले गट-तट अबाधित राखण्यासाठी पाठबळ देतात. ग्रामपंचायत सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न असतो.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे निर्माण होणारी कटुता टाळण्यासाठी काही गाव पुढाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव मांडून, अंतर्गत हालचाली सुरू केल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बिनविरोध निवडणुकीची चर्चा केली. तर, इच्छुकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज वाढले, तर माघारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
त्यामुळे, मोजक्या गाव पुढाऱ्यांनी चर्चा करून, बिनविरोध निवडणुकीचे प्रस्ताव गुलदस्त्यात ठेवले आहेत. एकूण 44 पैकी सुमारे 15 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय धुरीणी व्यक्त करीत आहेत. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.
संपादन : अशोक मुरुमकर