
आपल्या बाजूची असलेली व्यक्ती संध्याकाळी प्रतिस्पर्ध्यालाही तितकीच जवळची असते. त्यामुळे मतदारांच्या मनातील कोणीच ओळखू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पारनेर ः ""मी तुमचाच आहे भाऊ. माझ्याकडे येण्याची काय गरज होती? आम्ही तुमचेच काम करीत आहोत. विजय तुमचाच आहे,'' असे प्रत्येक उमेदवारास सांगून अनेक जण उमेदवारांची बोळवण करीत आहेत. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्तेही संभ्रमात पडत आहेत.
आपल्या बाजूची असलेली व्यक्ती संध्याकाळी प्रतिस्पर्ध्यालाही तितकीच जवळची असते. त्यामुळे मतदारांच्या मनातील कोणीच ओळखू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले. अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत नऊ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध झाल्या; मात्र उर्वरित 79 ग्रामपंचायतींसाठी रणसंग्राम पेटला आहे. त्या गावांत आता बैठका, जेवणावळी, गाठीभेटी व प्रभातफेऱ्या सुरू झाल्या आहेत.
प्रत्येक जण गावपातळीवर "आपलाच विजय आहे' या आविर्भावात फिरत आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापले आहे.
तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आमदार नीलेश लंके यांच्या, बिनविरोध निवडणुकीच्या आवाहनास काही प्रमाणात यश आल्याने, नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत; मात्र तरीसुद्धा मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
हेही वाचा - मोबाईल अॅपने केला घात, तीन पुणेकर गेले वाहून
तालुक्यात आता प्रचाराचा प्रारंभ, नारळ फोडणे, गावातून प्रचारफेरी काढणे, बैठका घेणे, रात्री-अपरात्री गुपचूप विरोधकांच्या गाठीभेटी, याशिवाय जेवणावळींना मोठ्या प्रमाणात सुरवात झाली आहे. अनेकांची भिस्त सोशल मीडियावर आहे. तेथे उमेदवार फोटो व चिन्हे टाकून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भित्तिपत्रक, बॅनर व पोस्टरबाजीवरही अनेकांनी भर दिला आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मी किंवा आमचे मंडळच कसे चांगले आहे, आमचे नेते कसे चांगले आहेत, याची माहिती कार्यकर्ते व उमेदवार सांगत आहेत.
मतदान चार दिवसांवर आल्याने, एकही मतदार भेटीशिवाय राहाता कामा नये, असे नियोजन बहुतेक गावांत उमेदवारांनी केले आहे. नाराज कार्यकर्त्यांसाठी वरिष्ठ पातळीवरून फोन करून नाराज कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यासाठी आता उमेदवार गळ घालत आहेत.