Ahmednagar : ग्रामपंचायतींवर विखे, गडाखांचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार शंकरराव गडाख

Ahmednagar : ग्रामपंचायतींवर विखे, गडाखांचे वर्चस्व

अहमदनगर : जिल्ह्यात उपसरपंचपदाच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या निवडीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शंकरराव गडाख यांचे मतदारसंघांतील गड शाबूत राहिले. दुसरीकडे, काष्टीचे उपसरपंचपदही हातचे गेल्याने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाला पुन्हा धक्का बसला आहे.

सरपंच निवडीनंतर उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे १५० ग्रामपंचायतींचे उपसरपंच निवडण्यात आले. पुढील दोन दिवस सलग निवडी होणार आहेत. सरपंच निवडीनंतर राजकीय नेत्यांनी तातडीने त्यांचे सत्कार करून आपल्या गटात त्यांना शाबूत ठेवले, काहींना खेचून घेतले. अशीच स्थिती उपसरपंचपदाच्या निवडीतही झाली. इतर सदस्यही आपल्याच पक्षाचे राहून वर्चस्व राहावे, यासाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी केली. विशेषतः भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसने जास्त जागा मिळविल्या.

राहुरीत १० पैकी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाला ६, राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या गटाला ४ उपसरपंच मिळाले. राहाता तालुक्यात सर्व नऊ ग्रामपंचायतींवर विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले. अकोले तालुक्यात ११ पैकी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा, तर माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पाच उपसरपंच झाले. कोपरगावमध्ये १२ पैकी सात काळे गटाकडे, तर तीन कोल्हे गटाकडे आणि एक अपक्ष आणि एक उपसरपंच राजेश परजणे गटाचे निवडून आले.

नेवासे तालुक्यात ११ पैकी गडाख गटाला १०, मुरकुटे गटाला १ उपसरपंच मिळाला. कांगोणी ग्रामपंचायतीत उपसरपंच मुरकुटे गटाचा झाला. सरपंचांच्या निवडीपेक्षाही उपसरपंचपद निवड चुरशीची झाली. शेवगावमध्ये १२ पैकी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत झाली. जामखेडमध्ये दोनपैकी एक भाजपला व दुसरा राष्ट्रवादीला मिळाला.

नगर तालुक्यात १४ उपसरपंचांच्या निवडी झाल्या. तेथे भाजप व राष्ट्रवादीत रस्सीखेच झाली. पारनेरमध्ये १६ उपसरपंच निवडी झाल्या. त्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. श्रीगोंद्यामध्ये १० पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच बाजी मारली. कर्जतमध्ये ८ पैकी भाजप व राष्ट्रवादीतच लढत झाली. पाथर्डीमध्ये ११ उपसरपंचांच्या निवडीत भाजप पाच व राष्ट्रवादी चार, प्रहार एक व वंचित आघाडी १, असे उपसरपंच झाले.

दृष्टिक्षेपात

अकोल्यात राष्ट्रवादीची सरशी

कोपरगावमध्ये काळे गटाचे सात उपसरपंच

नेवाशात गडाख गटाचे वर्चस्व

राहाता तालुक्यात विखे गट निर्विवाद