आजोबांचा हट्ट होता हेलिकॉप्टरमध्ये बसायचं, नातवांनी बर्थ डेला पुरवली हौस, गावातच बनवलं हेलिपॅड

आनंद गायकवाड
Tuesday, 12 January 2021

जगरहाटी काहीही असू देत संगमनेरात वेगळाच किस्सा घडलाय. मुले आणि नातवांनी आपल्या बाबांची आगळीवेगळी हौस पुरवली. आता परिसरात त्याचीच चर्चा सुरू आहे.

संगमनेर ः  प्रत्येकाचे आई-बाबा लहानपणी आपल्या मुलाचे लाड पुरवतात. बर्थ डे तर मुलांसाठी आनंदाचा क्षणच. मुलाने मागितले आणि वडिलांनी तो हट्ट पुरवला नाही असे सहसा होत नाही.

सायकल मागितली की सायकल. गाडी मागितली तर गाडी. खिशात पैसे नसतील तरी आई-बाबा मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी धडपडतात. परंतु हीच मुलं मोठी झाल्यावर आपल्या आई-वडिलांचा हट्ट पुरवायचे सोडाच, आपल्या पालकांना काय वागणूक देतात हे सर्व जग जाणते.

जगरहाटी काहीही असू देत संगमनेरात वेगळाच किस्सा घडलाय. मुले आणि नातवांनी आपल्या बाबांची आगळीवेगळी हौस पुरवली. आता परिसरात त्याचीच चर्चा सुरू आहे.

दोन दिवसांपासून कार्यक्रमस्थळी सुरु असलेली लगबग, मंडपासह शेजारच्या मोकळ्या जागेवर आखलेले मोठे वर्तुळ शेणाने सारवुन त्यावर रंगवलेले एच हे ठळक अक्षर, कोणीतरी मोठी सेलिब्रेटी येणार असल्याची ही पूर्व तयारी तालुक्याच्या तळेगाव पट्ट्यातील चिंचोली गुरव येथे सुरु होती.

आज सकाळी अकराच्या सुमारास सर्वांच्या नजरा आवाजामुळे आकाशाकडे लागल्या. निरभ्र आकाशातून झोकदार फेरी घेत एका निळ्याशार हेलिकॉप्टरने अलगद पाय जमिनीला टेकवले. त्यातून उतरलेल्या वयोवृध्द दांपत्याने स्वागताचा स्वीकार करीत कार्यक्रमस्थळी प्रवेश केला.

तालुक्यातील चिंचोली गुरव येथील डॉ. नंदकुमार गोडगे व प्रथितयश वकील अविनाश गोडगे यांनी अभीष्टचिंतनानिमित्त आपल्या आजोबांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची हौस पुरवून त्यांना आगळी वेगळी भेट दिली.

यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांना पुण्याहून खासगी हेलिकॉप्टरने चिंचोली गुरवच्या कार्यक्रमस्थळी आणले. आजोबा देवराम गोडगे व त्यांच्या पत्नी चहाबाई यांनी आयुष्यातील या पहिल्या हवाई प्रवासाचा आनंद घेत वाढदिवस साजरा केला.

हेही वाचा - पाथर्डीत सासूबाईंचेच सुनेला आव्हान, आमदार राजळे जाऊबाईंच्या पाठिशी

सेलिब्रेटी, राजकिय नेते, मोठे उद्योजक यांचा हेलिकॉप्टरमधून होणारा प्रवास ही नित्याची बाब आहे. सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात आकाशात भिरभिरणारी हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिली आहेत. मात्र, आजोबांची हौस पुरवण्यासाठी पदरमोड करुन त्यांना आकाशाची सफर घडवणाऱ्या गोडगे कुटूंबियांच्या या कल्पकतेचे अनेकांनी कौतुक केले आहे.

आजवरच्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत कुटूंबाची भरभराट करणाऱ्या ज्येष्ठांची इच्छापूर्ती करुन गोडगे कुटूंबियांनी त्यांना सुखद धक्का दिला आहे. या प्रसंगी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

नातवाची हत्तीवरून मिरवणूक

डॉ. नंदकुमार गोडगे यांच्या लग्नात आजोबा देवराम यांनी हत्तीवरून मिरवणूक काढत नातवाची हौस केली होती. आजोबांचीही हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा होती. ती नातवांनी पुरवली. देवराम हे गावी मुलगा शिवाजी यांच्यासोबत राहतात. हेलिकॉप्टरमध्ये बसविण्यासाठी त्यांना पुण्याला नेण्यात आले. तेथून हेलिकॉप्टर भाड्याने करून चिंचोलीत आणून वाढदिवसाला अनोखे गिफ्ट दिले. यासाठी लाखो रूपये गेले, परंतु आजोबांच्या आनंदापुढे ते थिटे होते, असं नातवांना वाटतं.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The grandchildren took the grandfather on a helicopter trip