नातवावर धावलेल्या बिबट्याला आजोबांनी काठीने बडवलं

राजेंद्र सावंत
Thursday, 26 November 2020

कारभारी गर्जे यांच्यासोबत धीरज प्रातविर्धीसाठी घरामागे शेतात गेले होते. हातात काठी घेऊन घरी परतत असताना, घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक धीरजवर हल्ला केला.

पाथर्डी : तालुक्‍यात पुन्हा एकदा बिबट्याने चिमुकल्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 79 वर्षांच्या आजोबांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा नातू थोडक्‍यात बचावला. आजोबांच्या हातच्या काठीचा प्रसाद खाऊन बिबट्या कसा तरी तेथून निसटला. आजोबांच्या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. 

कारभारी कुंडलिक गर्जे (वय 79) व धीरज रामदास गर्जे (वय 9, रा. पाडळी), अशी या आजोबा-नातवाची नावे. पाडळी शिवारातील म्हसोबा मंदिराशेजारी पाटाच्या कडेला आज पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. 

कारभारी गर्जे यांच्यासोबत धीरज प्रातविर्धीसाठी घरामागे शेतात गेले होते. हातात काठी घेऊन घरी परतत असताना, घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक धीरजवर हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या धीरजने मोठ्याने आरडाओरडा केला. 

आजोबांनी प्रसंगावधान राखत हातातल्या काठीने बिबट्यावर प्रतिहल्ला चढविला. आजोबांचा रुद्रावतार पाहून बिबट्याने माघार घेतली. शिकार सोडून त्याने तेथून पळ काढला. त्याच वेळी रामदास गर्जे व भानुदास गर्जे हातात बॅटरी घेऊन धावले. अंधाराचा फायदा घेत बिबट्या शेतात पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात धीरजच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. 

शेतकरी भीतीच्या सावटाखाली 
वन विभागाला पाडळी, चितळी, कासार पिंपळगाव परिसरात बिबट्या असल्याचे तेथील ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, "अफवा पसरवू नका,' असे सांगून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समज काढली. बिबट्याचे हल्ले वाढत असताना, शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. पिकाला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत असल्याने शेतकरी दहशतीखाली आहेत. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandfather beat the leopard with a stick