
संपूर्ण नातेवाईकांत आण,बाण आणि शान म्हणून नाव लौकिक असलेल्या ९४ वर्षीय आजीने आपल्या कांदापीकासह सोशल मीडियावर केलेली एंट्री चांगलीच गाजली आहे.
सोनई (अहमदनगर): शेतकऱ्याला पिकवायचं कळतं पण विकायचं कळत नाही. त्याच्या याच अज्ञानाचा अनेक व्यापारी फायदा उचलतात. परंतु घरात जी जुनी जानती माणसं आहेत, त्यांना हवामानाचं, बाजाराचं गणित चांगलंच कळतं. नेवासा तालुक्यात अशीच एक आजी आहे तिला सगळं कळंत.
संपूर्ण नातेवाईकांत आण,बाण आणि शान म्हणून नाव लौकिक असलेल्या ९४ वर्षीय आजीने आपल्या कांदापीकासह सोशल मीडियावर केलेली एंट्री चांगलीच गाजली आहे.
हेही वाचा - कोरोना वाढला ः प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
खरवंडी (ता.नेवासे) येथील ९४ वर्षीय आसराबाई मनाजी भोगे या वयातही कुटुंब, वस्ती आणि नातेवाईकांत आपल्या अनुभवामुळे प्रसिद्ध आहेत. शेतपीकाच्या अधिक उत्पादनासाठी त्यांचा सल्ला गाॅडफादर म्हणून मानला जातो. कारण त्यांचा अंदाज कधीच चुकत नाही. त्यांचे नातू दादासाहेब भोगे यांनी कांद्याच्या जुडीसह आजीचे छायाचित्र 'होय आम्ही महाराष्ट्र शेतकरी' या फेसबुक पेजवर टाकले आणि लाईक्सचा पाऊस सुरू झाला.
अनुभव आहे दांडगा
आजी या वयातही तास, दोन तास शेतात राबतात. त्यांना चांगले ऐकू येते, चष्मा लागलेला नाही आणि चांगल्या ताडताड चालतात देखील. पीक कोणते घ्यावे, काय टाळावे हा त्यांचा ठोकताळा नेहमीच यशस्वी होत आलेला आहे. मागील वर्षी भरपूर पाऊस झाल्यानंतर आजी म्हणाल्या होत्या, "कांदा कल्याण करी आता!". आणि खरोखरच कांद्याला अच्छे दिन आले. सध्याही कांदा भाव खावून चालला आहे.
नातू दादासाहेब आजीला विचारूनच शेतात पीक घेतो. आजीचे फेसबुकवर झळकलेले छायाचित्र व त्यास महाराष्ट्रातून मिळलेली वाहवा तालुक्यात कौतुकाचा विषय झाला आहे. अनेक युवा शेतकरी, शेती तज्ज्ञ व उद्योजकांनी आजीचे व कांदापीकाचे तोंडभरून कौतुक केल्याने भोगे परीवार भारावून गेला आहे.