
गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रवरा परिसरातील अडीचशे ते तीनशे एकर द्राक्षबागेपैकी निम्म्यापेक्षा जास्त बागांना यंदा फळे लागलेली नाहीत.
कोल्हार (अहमदनगर) : गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रवरा परिसरातील अडीचशे ते तीनशे एकर द्राक्षबागेपैकी निम्म्यापेक्षा जास्त बागांना यंदा फळे लागलेली नाहीत. आशा शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. बदलत्या हवामानामुळे पिके संकटात असताना चिंतातूर असलेल्या द्राक्ष उत्पादकांची वेलींना लागलेली द्राक्ष (सुक्ष्मघड) जगविण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, त्यासाठी करावी लागणारी औषध फवारणी व डीझेलवरील खर्च त्यांना सहन करावा लागत आहे.
हेही वाचा : दर्शनासाठी केवळ बारा हजार साईभक्तांची व्यवस्था; शिर्डीत गर्दी न करण्याचे आवाहन
कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात मागील हंगामात शेतकऱ्यांना द्राक्षे कवडीमोल भावाने विकावी लागली. द्राक्षांवर केलेला खर्चही वसूल झाला नाही. या हंगामात जादा पावसामुळे बागांचे नुकसान झाले. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शेतमजूर आपापल्या गावी गेल्यामुळे ती एक नवीन समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली होती.
मजुराअभावी बागेची कामे वेळेवर झाली नाहीत. म्हणून त्यावेळी स्थानिक उपलब्ध असलेल्या परंतु कामाचे कौशल्य व कामाची प्रवृत्ती नसलेल्या मजुरांकडून शेतकऱ्यांना जादा पैसे मोजून बागेची कामे करवून घ्यावी लागली. लॉकडाऊन उठल्यानंतर मजूर पुन्हा या परिसरात परतले. त्यांचा आधार बागांसाठी मिळाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागले. मात्र, यंदाची स्थिती अशी आहे की, एप्रिलमध्ये खरड व ऑक्टोबरमध्ये गोड छाटणी झाली. एप्रिलमध्ये बागांना काडी तयार होते.
एप्रिल छाटणीनंतर बागेला रोज किमान आठ तास या प्रमाणात 100 दिवस सलग सूर्यप्रकाश मिळाला तरच द्राक्षाच्या काडीत गर्भधारणा तयार होते. परंतु, अतिपाऊस व ढगाळ हवामानामुळे काडीमध्ये सूक्ष्मघड निर्मिती झाली नाही. द्राक्षबागेवर सध्या नियमित फवारणी तसेच बदलत्या हवामानामुळे रोग प्रतिबंधात्मक फवारणी सुरु आहे. मावा, तुडतुडे, दावणी, बुरी, थ्रीप्स वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पूर्व खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी वाढविली. त्यासाठी महागाची औषधे विकत घ्यावी लागत आहेत.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
डीझेलचेही भाव वाढले आहेत. एरवी बागेची छाटणी ते माल काढणीपर्यंत एकरी दोन लाखांपर्यंत खर्च येतो. यंदा तो खर्च 20 ते 25 हजारांनी वाढला आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी बापूसाहेब कडसकर यांनी सांगितले. प्रवरा परिसरात कोल्हार, भगवतीपूर, लोणी, बाभळेश्वर, हसनापूर, दुर्गापूर, राजुरी, ममदापूर या भागातील बहुतांश बागा (सुक्ष्मघड) फळाविना दिसत आहेत.
जादा पावसाचा परिणाम द्राक्ष बागांवर तर झालाच, परंतु शेतकऱ्यांनी द्राक्षाला रासायनिक खताचा वापर केल्यामुळे वेलींना द्राक्ष लागली नाहीत. कारण रासायनिक खतांमुळे ऑरगॅनिक कार्बन कमी होतो. जमिनीतील जीवाणू मरतात व त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते.
- बाळासाहेब खर्डे, द्राक्षतज्ज्ञ व सल्लागार
संपादन : अशोक मुरुमकर