शेतकऱ्यांच्या पोरांनो, या धंद्यात उतरा बक्कळ पैसा

Great benefit if goat rearing
Great benefit if goat rearing

नगर ः लॉकडाउनमुळे सर्वच जगच लॉक झाले आहेत. उद्योग-धंद्यासह नोकरी करणारेही परेशान आहेत. बहुतांशी कंपन्यांनी कॉस्ट कटिंग केलं आहे. त्यामुळे बेरोजगार लोकांचे लोंढेच्या लोंढे गावाच्या दिशेने आले आणि येत आहेत. गावाकडं काहीच कामधंदा नाही म्हणून शहरात स्थलांतरीत झालेली ही कुटुंब गावकुसाला आली आहेत. कोरोना महामारीने त्यांना पुन्हा गावपांढरीला यायला भाग पाडलं आहेत. कोरोनाचा कहर किती दिवस असाच राहणार आहे,याची शाश्वती नसल्याने सगळेच धास्तावले आहेत.

गड्या आपला गाव बरा म्हणून गावातच आपली पथारी टाकली आहे. ज्यांच्या घरी शेतीवाडी आहे, त्यांनी तिकडे लक्ष घातले आहे. गावावर आलेली बहुतांशी मंडळी ही शेतकऱ्यांची पुढची पिढी आहे. शेतीत लक्ष न घालता शहरात गेलेली ही मंडळी आहे. आता तिकडे काहीच शिजणार नाही असे दिसल्याने गावाकडे काही तरी जुगाड करण्याच्या तयारीत आहे. त्यांना सल्लागारही तसेच मिळत आहेत. काही सल्लागार कंपन्यांनी तर असे बकरे हेरायला सुरूवात केली आहे. ते कन्सल्टिंगचे चार्ज घेतात. गुलाबी स्वप्न रंगवून त्यांना धंद्यात उतरवित आहेत. अमका बिझनेस करा बक्कळ पैसा मिळेल, असे ते सांगत आहेत.

कोणतेही काम नसल्याने गावातच राहून काही तरी स्वदेश टाईप करायचं... असा विचार तरूण मंडळी करीत आहेत. कुकुटपालन किंवा शेळीपालनसारखा बिझनेस त्यांच्या गळी उतरविला जात आहे. नेमके या बिझनेसमध्ये खरोखरच पैसा आहे का... किंवा फक्त तशी हवा केली जाते. तज्ज्ञांसोबत तसेच शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शेळीपालनाविषयी जाणून घेतले. त्यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया, मते जशीच्या तशी...

कोणाला करता येतो हा बिझनेस

शेळीपालन व्यवसाय करून अनेकांनी बक्कळ पैसा कमावल्याची उदाहरणे आहेत. कोणतीही पार्श्वभूमी नसताना सक्सेस झालेल्यांची यादीही मोठी आहे. परंतु या धंद्यात पडल्यामुळे कायमचे गळून गेलेलेही आहेत. खरोखर या बिझनेसमध्यै पैसा आहे का तर आहे. मात्र, कोणताही बिझनेस म्हटला की तो त्याच पद्धतीने केला पाहिजे. केवळ छानछौकी राहून हा व्यवसाय होत नाही. शेळीपालन व्यवसाय करून नोकरी करणारे विकास गुंड (वडगाव तांदळी, नगर तालुका) यांना विचारले असता, शेळीपालनात भरपूर नफा आहे. परंतु तो कमावण्यासाठी काही पथ्य आहेत. उस्मानाबादीच शेळी घेतली पाहिजे. गावरान शेळीच्या बोकडांना मार्केट चांगले आहे. अर्धबंधिस्त शेळीपालनास महत्त्व दिले पाहिजे. पाच एकर जिरायत शेती एकीकडे आणि दुसरीकडे दहा शेळ्या असतील तरी बरोबरी होते.

एक शेळी साधारण अठरा महिन्यात दोनदा करडू देते. वेळोवेळी लसीकरण, बुळकुंडीसारखे आजार जपले तर या धंद्यात काहीच मरण नाही. परंतु किमान दोन तास तरी शेळ्या फिरून आणल्या पाहिजे. तुमच्याकडे एक एकर जरी शेती असली तरी तुम्ही किमान महिन्याला ४० ते ५० हजार रूपये कमावू शकता, असे गुंड सांगतात. 

आर्थिक गणित

एक शेळी चौदा महिन्यातून दोन येते. तिला किमान चार करडे होतात. एक करडू चार महिन्यात पाच ते सहा हजार रूपयांना विकले जाते.चांगले खुराक असेल तर ते पंधरा किलोपर्यंत भरते. मग त्याचा दरही वाढतो. सगळा खर्च जाऊन एक करडू तुम्हाला किमान पाच हजार रूपये नफा देते. त्यापासून मिळणारे दूध आणि खत वेगळेच. उस्मानाबादी शेळी रोगाला बळी पडत नाही. मात्र, हा व्यवसाय करायचा झाल्यास तुमचे त्यावर प्रेम हवे. अनुभवच तुम्हाला सर्व काही शिकवून जातो, असे शेळीपालक गुंड सांगतात.

भांडवल उभारणी

कोणताही बिझनेस उभा करायचा झाल्यास सरकार मदत करते. तुमच्याकडे एक एकर शेती असेल तर अर्थसाह्य दिले जाते. पंचायत समितीकडी योजनेतून १० शेळ्या आणि एका बोकडासाठी ७१ हजार रूपये खरेदीसाठी मिळतात. त्यात ७५ टक्के सबसीडी आहे. राज्य सरकारच्या नाविन्यपूर्ण योजनेत तेवढ्याच शेळ्यांसाठी ६७ हजार रूपये मिळतात. गोठा बांधणीसाठीही मदत केली जाते. धनगर समाजासाठी अहल्याबाई होळकर यांच्या नावाने योजना आहे. शिवाय बँकेचे प्रकरणही करता येते. विमा कव्हरही करता येते. संगमनेरी, उस्मानाबादी, शिरोही शेळ्या चांगला फायदा देतात. उत्पादनासोबत मटणविक्री स्वतः केल्यास फायदाच फायदा आहे.

-सचिन चोभे, कृषी अभ्यासक, अहमदनगर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे गोट फार्मिंग आहे. देशी शेळ्या येथे जतन केल्या जातात. संगमनेरी, उस्मानाबादी शेळ्यांवर संशोधन केले आहे. शेळी ही फिरणारी जात आहे. तिला बंधिस्त करून चालत नाही. किमान अर्धबंधिस्त असल्यास चांगला रिझल्ट मिळतो. ब्रिडिंग, खाद्यावरील खर्च, विमा कवच, व्यवस्थापन या गोष्टी सांभाळल्या तर कोणतीच अडचण येत नाही. केवळ दुसरा व्यवसाय करतो म्हणून आपण तो करू नये. बहुतांशी वेळा कॉलेजात जाणारी मंडळी यात उतरतात. कोणतीच माहिती नसल्याने या बिझनेसमध्ये डुबतात. याकडेही लक्ष दिले पाहिजे. यामुळे विद्यापीठ कमी खर्चात प्रशिक्षण देते.

- डॉ. संजय मंडपवाले,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, शेतीसुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.

शेळी आणि अख्यायिका

शेळीच्या दुधाला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. शेळी ही बारा ठिकाणचा झाडपाला खाते. त्यामुळे तिच्या दुधात अौषधी गुणधर्म उतरतात. त्यामुळे या दुधाला खूप मागणी आहे. परंतु त्याचा वास येत असल्याने सर्वसामान्य लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. अलिकडे शेळीच्या दुधाच्या पनीरला खूप मागणी आहे. प्रत्येकाला अॉरगॅनिक खायचे आहे. त्यामुळे शेळीपालन करणाऱ्याचे त्याचे मार्केटिंग केल्यास नफ्यात निश्चितच भर पडेल. बोकडाच्या मटणाचे दर दररोज उच्चांक गाठत आहेत. परंतु त्याचा पाळणाऱ्याला फारसा फायदा होत नाही. त्याने स्वतः कटिंग करून मार्केटिंग केल्यास नक्कीच फायदा आहे.

- डॉ. सचिन सदाफळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com