esakal | दिवाळीला पोस्टाने येणारी शुभेच्छा पत्र कालौघात झाली अस्तंगत
sakal

बोलून बातमी शोधा

Greetings from the post are no longer coming

भारतीय परंपरेनुसार कुठलाही सण- सोहळा म्हटले, की शुभेच्छा, अभिनंदन ओघाने आलेच.

दिवाळीला पोस्टाने येणारी शुभेच्छा पत्र कालौघात झाली अस्तंगत

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : सोशल मीडियाच्या आजच्या युगात दिवाळीसह इतर सणांची पोस्टाने येणारी शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग) काळाच्या पडद्याआड गेली आहेत. याउलट, व्हॉट्‌सऍप, फेसबुक, टेक्‍स्ट मेसेज, इन्स्टाग्रामसह विविध प्रकारे शुभेच्छा देण्याची धांदल सुरू आहे. मात्र, शुभेच्छापत्रे व संदेशाची वाट पाहण्याचे "थ्रिल' संपल्याचे जुने जाणकार सांगतात. 

भारतीय परंपरेनुसार कुठलाही सण- सोहळा म्हटले, की शुभेच्छा, अभिनंदन ओघाने आलेच. काही वर्षांपूर्वी दिवाळी, दसरा, राखीपौर्णिमा, मकर संक्रांत, प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, नाताळ, ईदसह विविध सणांसाठी शुभेच्छापत्रे पाठविण्याची धांदल असायची.

या खास सणासाठी बनविलेल्या शुभेच्छापत्रांची खास स्वतंत्र दालने प्रत्येक दुकानात असायची. मग ती खरेदी करताना त्यावर आकर्षक मायना लिहिलेला असायचा. त्यातील पत्रे पसंत करून ती पाठविण्यात यायची.

याशिवाय पोस्टाने राख्या, तिळगूळ, एवढेच काय; विवाहाच्या पत्रिकाही पाठविल्या जायच्या. त्या आपल्याला कधी मिळतील याची उत्सुकता सर्वांनाच असायची. त्याच्या चौकशीसाठी आपसुक टपाल कार्यालय व पोस्टमनकडे हेलपाटे मारले जायचे. 
मात्र, बदलत्या काळाबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे नवनवीन संशोधन झाले, शोध लागले.

वीस- पंचवीस वर्षांपूर्वी जर कोणी हवेतून बोलण्याचा संकल्प सांगितला, तर त्याला वेड्यात काढले जायचे. मात्र, सध्या सर्व कामे मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर केले जातात. बहीण-भावाच्या प्रेमाची प्रचिती, तसेच अतूट नात्याची अनुभूती देणारी शुभेच्छापत्रे जी पोस्टाने यायची, तो फंडा कालबाह्य होत चालला आहे. अपवाद सोडल्यास सर्व निरोप सोशल मीडियावर पाठविले जातात. 

तरुणपणी ग्रामपंचायतीशेजारी पोस्टाची पेटी अडकवलेली असायची. ती दर आठवड्याला उघडली जायची. पोस्टमन आलेली पाकिटे, ग्रीटिंग नावाप्रमाणे किंवा घराप्रमाणे छाननी करून ठेवायचे. उत्सुकता शिगेला पोचलेली असायची. ते टपाल किंवा ग्रीटिंग हातात पडल्यावर आनंद गगनात मावत नसायचा. कधी कधी सण होऊन गेल्यावरही शुभेच्छा मिळायच्या. मुलगा नोकरीच्या ठिकाणाहून मनीऑर्डर पाठवायचा. ते पैसे पोस्टमनकडे यायचे. मोठा आनंद व्हायचा. 
- उत्तम कदम, ज्येष्ठ नागरिक, माहिजळगाव 

संपादन - अशोक निंबाळकर