अहमदनगर : भाजीपाला वधारला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

दिल्लीकरांच्या सरबताला नगरची लिंबे
vegetables grew news
vegetables grew newssakal
Updated on

अहमदनगर: घरगुती गॅस आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच हिरव्या मिरचीने भाव खाल्ला आहे. सर्वसामान्य नगरकर फोडणीला महाग झाले आहेत. स्थानिक मिरची उपलब्ध नसल्याने थेट उत्तर प्रदेशमधील हिरवी बरेली मिरची शहरात दाखल झाली खरी; पण तरी मिरचीच्या दराने शंभरी गाठलीच. ठाणे जिल्ह्यातून भेंडी, गाजर, काकडीची आवकही सुरू आहे, तरी भाजीपाल्याच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे नगरकरांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.

भाजीपाला हा प्रत्येक कुटुंबातील गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय. दहा रुपयांची भाजी दोन रुपयांनी स्वस्त मिळावी यासाठी चार ठिकाणी फिरणारी गृहिणी सध्या अक्षरशः रडकुंडीला आलीय. दहा रुपयांना मिळणाऱ्या भाजीसाठी तिला आता २० ते २५ रुपये मोजावे लागतात. ऊसउत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेला नगरचा शेतकरी आता तेवढ्याच ताकदीने भाजीपालादेखील पिकवत आहे.

कांदा, बटाटा, लसूण, मेथी, टोमॅटो, भेंडी, वांगी, शेपू, कोथिंबीर, गवार, कोबी आणि फ्लॉवर, अशा एक ना अनेक प्रकारचा भाजीपाला येथील शेतकरी पिकवतात, तरीदेखील इतर शहरांतून भाजीपाल्याची आयात करण्याची वेळ सध्या ओढवली आहे.

उत्तर प्रदेशची मिरची, ठाणे येथील भेंडी, गाजर, काकडी व इतर भाजीपाला नगरच्या बाजारात दाखल झाला; मात्र नगरकरांना तो चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे.

लिंबू वधारले

लिंबांचे दर दोनशे रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. श्रीगोंदे, राहुरी, नगर तालुक्यांत लिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. असे असतानाही सध्या नगरकरांच्या घरातील लिंबू नाहीसे होऊन ते थेट राजधानी दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये पोचले आहे. इतर शहरांतील व्यापारी येथील लिंबूउत्पादक शेतकऱ्यांच्या थेट शेतात येऊन लिंबांची खरेदी करत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

असे आहेत दर (किलोप्रमाणे)

कांदा (१५- २०), बटाटा (२५- ३०), गावरान लसूण (६०-७०), मिरची (८०-१००), भेंडी (६०- ७०), गवार (४०- ५०), शेवगा (८०- १००), दुधी भोपळा (३०- ४०), वांगी (६०- ७०), काकडी (३०- ४०), कोबी (३०- ४०), फ्लॉवर (३०- ४०), वाल (४०- ५०), मेथी जुडी (१०- १५), शेपू (१५- २०), पालक (१५- २०), करडी (१५- २०), कोथिंबीर (१५- २०).

जिल्ह्याला पुरेल एवढ्याच भाजीपाल्याची आवक सध्या बाजार समितीमध्ये सुरू आहे. काही भाजीपाला ठाणे जिल्ह्यातून येतो. पुरवठा कमी आणि मागणी जास्त, अशी स्थिती निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. जून महिन्यापासून हे दर नियंत्रणात येतील.

- मोहन गायकवाड, भाजीपाला व्यापारी

आम्हाला चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. परिणामी, त्याच दराने तो विकावा लागतो. आठ ते १० टक्‍के आडतदेखील द्यावी लागते. यात काही भाजीपाला खराब होण्याचा धोकादेखील असतोच. दोन पैसे मिळवेत एवढीच आमची अपेक्षा असते. एवढे करूनदेखील आम्हाला ग्राहकांचा रोष पत्करावा लागतो.

- सुनील जाधव, भाजीविक्रेता, नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com