
शिर्डी : विविध माध्यमे व वृत्तपत्रात दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, तर त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होते. हे लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या सचिवांनी त्याबाबत लगेच खुलासा करावा. सरकारची बाजू मांडावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाच्या सचिवांना यापूर्वीच दिले आहेत. त्यास प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात सरकारी योजना व सार्वजनिक विकास योजनाबाबतच्या तक्रारी व नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारींचे निरसन करण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून स्वतंत्र यंत्रणा सुरू केली. त्यास सरकारी अधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी मार्गी लागण्यास मदत होते आहे.