esakal | श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे नेते स्वार्थी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांकडून घरचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे नेते स्वार्थी - हरिदास शिर्के

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : श्रीगोंद्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) पक्षवाढीस पोषक वातावरण आहे. पक्षाच्या स्थापनेपासून आपण कार्यकर्ते आहोत. यापूर्वी पक्ष जोमाने वाढला, मात्र काही वर्षांत स्थानिक नेते आपला गट आणि स्वत:ची प्रतिमा वाढविण्यात गुंतले आहेत. नेते मंत्र्यांपुढे वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र येतात. मात्र, तालुक्‍यात जवळच्या कार्यकर्त्यांनाच घेऊन बसतात. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या नेत्यांची पुराव्यानिशी तक्रार आपण प्रदेशाध्यक्षांकडे करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी दिला आहे. Haridas-shirke-critized-NCP-leader-in-Shrigonda-marathi-news-jpd93)

तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांचा घरचा आहेर

शिर्के 'सकाळ'शी बोलत होते. त्यांच्या आरोपांचा रोख पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार व माजी आमदार राहुल जगताप यांच्या दिशेने होता. ते म्हणाले, की श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात आमचे नेते शरद पवार व अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पवार घराण्याबद्दल सामान्यांना आपुलकी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद मोठी असून, ती अजून वाढू शकते. गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यावर असणाऱ्या प्रेमामुळेच एक लाखाच्या घरात मते मिळाली.

श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे नेते स्वार्थी - शिर्के

पवारांच्या ताकदीचा पक्षवाढीत स्थानिक नेते उपयोग करून घेत नसल्याचा आरोप करीत शिर्के म्हणाले, की तालुक्‍यातील पक्षाचे नेते स्वार्थ साधण्यासाठी मंत्री, पवार कुटुंब यांच्यापुढे एकत्र दिसतात. तालुक्‍यात आल्यावर सामान्य कार्यकर्त्यांचे काय चालले आहे, याचे त्यांना घेणे-देणे नसते. ठरावीक, जवळ असणाऱ्याच कार्यकर्त्यांची विचारपूस होताना दिसते. पक्षवाढीसाठी गेल्या दोन वर्षांत कार्यकर्त्यांची एकही बैठक झाली नाही. कार्यकर्त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी मेळावा घेतला नाही. तालुक्‍यातील नेते पदाधिकारी म्हणून जवळच्या लोकांच्या नियुक्‍त्या करतात. त्याबाबत माझ्यासह पक्षातील जबाबदार पदाधिकाऱ्यांना माहितीही नसते. अनेक वेळा स्थानिक पातळीवर झालेली नियुक्ती मलाही सोशल मीडियातील पोस्टवरून समजते. नेतेच जर विश्वासात घेत नसतील, तर गाऱ्हाणे वरिष्ठांकडेच मांडावे लागते आणि तेच करणार आहे.

स्थानिक निवडणुका लागल्यावर नेते छुपी युती करून स्वार्थ साधत असल्याने, निष्ठावंत अनेक कार्यकर्ते दुरावले जाण्याची भीती आहे. नवीन कार्यकर्ते पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, जुन्यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यास माझ्यासह नेत्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, याचे भान या नेत्यांनी ठेवावे. - हरिदास शिर्के, श्रीगोंदे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस

हेही वाचा: पत्नी, चिमुरडा नियतीसमोर हतबल; पित्याचा डोळ्यांदेखत बुडून मृत्यू

हेही वाचा: ‘अर्बन’ बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

loading image
go to top