तोडणीला आलेला ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक, महावितरण आमचा काय संबंध

विलास कुलकर्णी
Saturday, 5 September 2020

उसाच्या प्लॉट वरून महावितरणची ३३ केव्ही व ११ केव्ही क्षमतेची उच्चदाब वीज वाहिनी गेलेली आहे. खालची वीज वाहिनी उसाच्या शेंड्याला टेकत असल्याने, ऊस पेटल्याचे आदेश जाधव यांनी सांगितले

राहुरी : येवले आखाडा येथे आज (शनिवारी) दुपारी साडेबारा वाजता ऊस पिकाला अचानक आग लागली.  दोन एकर क्षेत्रापैकी सव्वा एकर ऊस जळून खाक झाला.  पन्नास-साठ तरुणांनी दीड तास प्रयत्न करून, आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे, आसपासचा दहा एकर ऊसप्लॉट वाचला.

ऊस मालकांनी महावितरणच्या वीजवाहिनी येथील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले. तर; महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी आगीचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले. त्यात, शेतकऱ्याचे एक लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले.

हेही वाचा - शिवसेनेचा केंद्रबिंदू सरकला सोनईकडे, महापौर शिवसेनेचाच होईल

सुरेश जगन्नाथ जाधव (रा. येवले आखाडा) यांच्या दोन एकर आडसाली ऊसाच्या प्लॉटला अचानक आग लागली. राहुरी पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. परंतु, रस्त्यापासून आगीचे ठिकाण लांब असल्याने उपयोग झाला नाही. पन्नास-साठ तरुणांनी जीव धोक्यात घालून उसात शिरले. आगीच्या पुढील बाजूचा ऊस मोडून, आग पसरणार नाही. यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. तरी, दोन एकर पैकी सव्वा एकर ऊस जळून खाक झाला.

उसाच्या प्लॉट वरून महावितरणची ३३ केव्ही व ११ केव्ही क्षमतेची उच्चदाब वीज वाहिनी गेलेली आहे. खालची वीज वाहिनी उसाच्या शेंड्याला टेकत असल्याने, ऊस पेटल्याचे आदेश जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, "ऊसात आगीवर नियंत्रण मिळवितांना माझ्यासह हेमंत जाधव व बाळासाहेब जाधव यांना उसात करंट उतरल्याचे जाणवले. तिघांच्या हाताला मुंग्या येत आहेत. राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी चाललो आहे."

 

जळीत उसाची पाहणी केली. ऊस वाढलेला आहे. ११ केव्हीची वीज वाहिनी उसाच्या शेंड्याजवळ आहे. परंतु, वीज वाहिनीला उसाचा स्पर्श झाला असता, तर वीजपुरवठा खंडित झाला असता. तसे झाले नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली. असे म्हणता येणार नाही. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

- योगेश गावले, उप अभियंता, महावितरण, राहुरी, अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The harvested cane was burnt due to short circuit