शिवसेनेचा केंद्रबिंदू सरकला सोनईकडे, मंत्री गडाखांनी टाकले महापौरपदासाठी फासे

अशोक निंबाळकर
Saturday, 5 September 2020

गडाख यांच्याभोवती शिवसेनेचे राजकारण फिरू लागले आहे. त्यांनीही शिवसेना बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. शहर शिवसेनेत लक्ष घातले आहे. आगामी महापौर निवडणुकीबाबतही त्यांनी फासे टाकायला सुरूवात केली आहे. 

नगर ः जिल्ह्यात कोरोनाच्या काळात राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन निवडून आलेले नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधले. नगर शहरातील माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर शहरातील समीकरणे बदलली आहेत.

नगर शहरातील माजी आमदार अनिल राठोड हयात होते तोपर्यंत तेच पक्ष होते. त्यांचा शब्दच शिवसेनेत अंतिम होता. विधानसभेत पराभवानंतरही त्यांनी पक्षावरील मांड ढिली होऊ दिली नव्हती. कट्टर शिवसैनिक त्यांच्या शब्दबाहेर नव्हता. परंतु आता शिवसेना आंतर्बाह्य ढवळून निघाली आहे.

सर्वसामान्य शिवसैनिक सैरभैर आहे. तर नेते, नगरसेवक गटबाजीत अडकून पडले आहेत.परंतु मंत्री गडाख यांनी शिवबंधन बांधल्यानंतर शिवसैनिकांत पुन्हा चैतन्य आले आहे. गडाखांसारखा दिग्गज नेता शिवसेनेला मिळाल्याचा त्यांना आनंद आहे. या घडीला शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे गडाख हेच शिवसैनिकांसाठी आशेचे ठिकाण असल्याची चर्चा आहे.

गडाख यांच्याभोवती शिवसेनेचे राजकारण फिरू लागले आहे. त्यांनीही शिवसेना बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. शहर शिवसेनेत लक्ष घातले आहे. आगामी महापौर निवडणुकीबाबतही त्यांनी फासे टाकायला सुरूवात केली आहे. मंत्री गडाख यांचे कनिष्ठ बंधू प्रशांत यांचे कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. शिवसेनेला अनायासे त्यांचा फायदा होऊ शकतो.

शहर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी काल जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, या वेळी शहर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड झाली. दोन्ही गटांनी मंत्री गडाख यांच्यासमोरच आरोप-प्रत्यारोप केले. गडाख यांनी दोन्ही गटांना समज दिली. 

हेही वाचा - प्रशासक बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे, माजी महापौर अनिल शिंदे, अभिषेक कळमकर, नगरसेवक अमोल येवले, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, संभाजी कदम, संतोष गेनप्पा, दत्ता जाधव, परेश लोखंडे, अशोक बडे आदी उपस्थित होते. 

आगामी महापौर निवडीसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. महापौर निवडणुकीत लक्ष घालणार असून, शिवसेनेचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करू, असे गडाख यांनी सांगितले. दर आठवड्याला नगर शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचेही गडाख म्हणाले. सध्या नगर शहरात भाजपचा महापौर आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. मात्र, ते सत्तेपासून दूर आहेत. सध्या राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना आघाडीचे राज्यात सरकार आहे. तो फायदा नगर शहरातही होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

बाबूशेठ टायरवाले पुन्हा घालणार जय महाराष्ट्र

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांना पुन्हा शिवसेनेत सक्रीय करण्याबाबत चर्चा झाली. मंत्री गडाख लवकरच जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्याचे नियोजन आगामी आठवड्‌यात केले जाणार आहे. दौऱ्याला अकोल्यातून सुरवात होणार असल्याचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले. माजी आमदार अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नक्षत्र लॉनवर 20 सप्टेंबरला शोकसभा होणार आहे. त्यासाठीही मंत्री गडाख उपस्थित राहणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena's command to Gadakh